दाबोळी विमानतळाजवळ होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गोवाकॅनकडून चौकशीची मागणी

दाबोळी विमानतळाजवळ मोठे जाहिरातीचे होर्डिंग कोसळून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी गोवाकॅनने केली आहे. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
दाबोळी विमानतळाजवळ होर्डिंग कोसळल्याप्रकरणी गोवाकॅनकडून चौकशीची मागणी

वास्को : दाबोळी विमानतळाजवळ मोठे जाहिरातीचे होर्डिंग कोसळून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचल्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी गोवाकॅनने (GOACAN) केली आहे. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

गोवाकॅनचे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आणि वर्दळीच्या रस्त्यावर होर्डिंग कोसळणे ही गंभीर बाब आहे. यामुळे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकला असता,  असे त्यांनी नमूद केले.

या घटनेची चौकशी करताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), जिल्हा पोलीस, वाहतूक पोलीस,  भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित ग्रामपंचायतीच्या भूमिकेची तपासणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी गोवाकॅनने  केली आहे.

मानक कार्यपद्धती लागू करावी 

तसेच दाबोळी परिसरासह दक्षिण गोव्यातील इतर ठिकाणी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जाहिरातींच्या होर्डिंगबाबत स्पष्ट मानक कार्यपद्धती (SOP) लागू करावी,  अशी मागणी संघटनेने केली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, ही बाब प्रशासनाने भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची संधी म्हणून पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार असल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस संदेश देणे आवश्यक असल्याचेही गोवाकॅनने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

या निवेदनाच्या प्रती महसूल, वाहतूक, पर्यटन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्य विद्युत अभियंता, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक आणि वाहतूक पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा
सर्व पहा