आईचा जीव वाचवण्यासाठी १० वर्षांच्या चिमुकलीने दिली मगरीशी थेट झुंज!

चिपळूण येथील वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुणाऱ्या महिलेवर मगरीने प्राणघातक हल्ला केला. मात्र, १० वर्षांच्या मुलीने अफाट धैर्य दाखवून आईला मगरीच्या जबड्यातून सुखरूप बाहेर खेचून आणत तिचे प्राण वाचवले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
आईचा जीव वाचवण्यासाठी १० वर्षांच्या चिमुकलीने दिली मगरीशी थेट झुंज!

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी परिसरात वाशिष्ठी नदीच्या काठावर एका १० वर्षांच्या चिमुकलीच्या अफाट धैर्याची आणि बालशौर्याची थरारक घटना घडली आहे. नदीपात्रात कपडे धुणाऱ्या आईवर पाण्यातील अजस्र मगरीने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. मात्र, प्रसंगावधान राखत १० वर्षांच्या लहान मुलीने दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळे आणि ताकदीमुळे आई मगरीच्या जबड्यातून सुखरूप बाहेर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी भूपेंद्र पवार या नेहमीप्रमाणे वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची १० वर्षांची मुलगी स्वर्णी हीदेखील त्यांच्यासोबत होती. नंदिनी या नदीकाठी कपडे धुण्यात व्यस्त असताना, पाण्याच्या पात्रात दबा धरून बसलेल्या एका अजस्र मगरीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने नंदिनी यांचा पाय आपल्या दणकट जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्याच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या नंदिनी यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नदीकाठावरील एक मोठा दगड घट्ट पकडून ठेवला. मात्र, मगरीच्या प्रचंड ओढण्यामुळे त्यांची ताकद कमी पडू लागली होती.

आपल्या आईला मगर पाण्यात खेचून नेत असल्याचे दृश्य पाहून १० वर्षांची स्वर्णी क्षणभर हादरली, परंतु तिने पळून न जाता अत्यंत धैर्याने आईचा हात घट्ट पकडला. स्वतःच्या अंगातील संपूर्ण शक्ती पणाला लावून स्वर्णीने आईला पाण्याच्या बाहेर खेचण्यास सुरुवात केली. आईनेही दगडाचा आधार न सोडता मुलीच्या प्रयत्नांना साथ दिली. अखेर या माय-लेकीच्या एकत्रित संघर्षापुढे मगरीची ताकद कमी पडली आणि मगरीने पायावरील आपली पकड सोडली. या भीषण हल्ल्यात नंदिनी पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिमुकल्या स्वर्णीच्या या अभूतपूर्व बालशौर्याचे संपूर्ण चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा