सावंतवाडी : सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावात उडी घेऊन दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान, तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या तिच्या एका नातेवाईक तरुणाचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सावंतवाडी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कारिवडे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणारी लिसा गोसावी ही शनिवारी सकाळची शाळा आटोपून आपल्या चुलत बहिणीसह सावंतवाडीत आली होती. दरम्यान, मुंबईहून गावी आलेला तिचा नातेवाईक रोहन गोसावी (रा. नाधवडे, वैभववाडी) हादेखील तिला भेटण्यासाठी सावंतवाडीत आला होता. तिघेही मोती तलाव परिसरातील बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याजवळ थांबले होते. लिसा तलावाच्या कठड्यावर पाण्याचा दिशेने तोंड करून बसलेली असताना तिने अचानक पाण्यात उडी घेतली.
लिसाने उडी घेताच तिच्या चुलत बहिणीने आरडाओरड केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोहन गोसावी याने क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली असता, रोहनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. नागरिकांनी त्याला तातडीने बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. विद्यार्थिनी खोल पाण्यात बुडाल्याने तिचा शोध घेण्यात अडथळे येत होते.
ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ‘सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीम’ला पाचारण केले. रेस्क्यू टीमने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवून अखेर विद्यार्थिनीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेनंतर तलावाकाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व पोलीस कर्मचारी हर्षद हिंगे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.


