कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला निरीक्षक मीरा डिसिल्वांनी वाचवले

जुन्या मांडवी पुलावरून दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आत्महत्येच्या विचारात असलेल्या मातेला महिला पोलीस निरीक्षक मीरा डिसिल्वा यांनी वेळेत अडवले. पोलिसांनी वेळेत केलेल्या समुपदेशनामुळे दोन निष्पाप जीवांचे प्राण सुदैवाने वाचले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला निरीक्षक मीरा डिसिल्वांनी वाचवले

पणजी : कौटुंबिक तणावातून कंटाळून एक महिला आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्या बालकाला सोबत घेऊन जुन्या मांडवी पुलाच्या दिशेने जात होती. ती महिला आपल्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन जीवन संपवण्याच्या टोकाच्या विचारात होती. रात्रीच्या वेळी अत्यंत अस्वस्थ आणि विचलित अवस्थेत पायी जात असताना, त्याच वेळी पणजी महिला पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस निरीक्षक मीरा डिसिल्वा या पर्वरीच्या दिशेने प्रवास करत होत्या. महिलेची एकंदरीत शारीरिक हालचाल, तिच्या चेहऱ्यावरील कमालीचे नैराश्य आणि सैरभैर अवस्था मीरा डिसिल्वा यांच्या लक्षात आली. हे काहीतरी अस्वाभाविक आणि गंभीर असल्याचे ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले वाहन थांबवले आणि त्या तातडीने महिलेच्या दिशेने पुढे गेल्या.

पोलीस अधिकारी जवळ आल्याचे पाहून सुरुवातीला ती महिला घाबरली, मात्र निरीक्षक मीरा डिसिल्वा यांनी तिला विश्वासात घेतले. आत्मीयतेने विचारपूस केली असता, त्या महिलेने आत्महत्येचा विचार मनात घेऊन मांडवी पुलावर आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती बोलून दाखवली. गेल्या दोन दिवसांपासून ती स्वतःला व आपल्या बालकाला संपवण्याचा मार्ग शोधत होती. 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक मीरा डिसिल्वा यांनी तिला आणि तिच्या लहान मुलाला सुरक्षितपणे शासकीय वाहनात बसवले व पणजी महिला पोलीस स्थानकात आणले. पोलीस स्थानकात आणल्यानंतर प्रथम त्यांना शांत करून आवश्यक ती प्राथमिक काळजी घेण्यात आली. त्यानंतर लगेचच दोन्ही बाजूंच्या पालकांना व नातेवाईकांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. महिला पोलीस स्थानकात दोन्ही कुटुंबांना एकत्र बसवून तज्ज्ञ व पोलिसांच्या उपस्थितीत सखोल समुपदेशन करण्यात आले. कौटुंबिक वाद संवादाने सोडवण्याबाबत तसेच कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याबाबत दोन्ही पक्षांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

महिला पोलीस अधिकारी मीरा डिसिल्वा यांनी ऐनवेळी दाखवलेले प्रसंगावधान,आणि कर्तव्यदक्षता यांमुळे एका निष्पाप बालकाचा आणि त्याच्या मातेचा जीव वाचला आहे. केवळ कायद्याची अंमलबजावणी करणे एवढेच नव्हे, तर मानवी संवेदना जपून संकटसमयी आधार देणे हेदेखील पोलिसांचे कर्तव्य असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महिला पोलिसाच्या या तत्परतेमुळे दोन निष्पाप जीवांना नवजीवन मिळाले असून, सर्व स्तरातून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.




हेही वाचा
सर्व पहा