शिकेरी-मये येथे गोशाळा परिसरातील घराला आग, सुदैवाने गायी बचावल्या

मये मतदारसंघातील शिकेरी येथे गोशाळा परिसरात भीषण आग लागून १० लाखांचे नुकसान झाले, तर पिळगाव-सारमानस येथे चिखलाच्या समस्येमुळे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सेसा वेदांताची खनिज वाहतूक रोखून धरली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 hours ago
शिकेरी-मये येथे गोशाळा परिसरातील घराला आग, सुदैवाने गायी बचावल्या

पणजी :  शिकेरी-मये येथे गोमंतक गोसेवा महासंघाचे अध्यक्ष कमलाकर तारी यांच्या राहत्या घराला आणि गोशाळा परिसराला काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य नेहमीप्रमाणे सायंकाळच्या भजनात मग्न असताना अचानक स्वयंपाकघराच्या बाजूने धूर आणि आगीचे प्रचंड लोट निघत असल्याचे निदर्शनास आले. आगीची तीव्रता पाहून कुटुंबियांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने बादल्यांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीच्या ज्वाला अत्यंत तीव्र असल्याने घरातील स्वयंपाकघर, बैठकीची खोली आणि बेडरूमधील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भांडी, कपडे व अन्य गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या भीषण दुर्घटनेबाबत बोलताना गोमंतक गोसेवा महासंघाचे अध्यक्ष कमलाकर तारी यांनी भावूक होत सांगितले की, आम्ही सर्वजण सायंकाळच्या भजनात मग्न असताना अचानक आगीचा भडका उडाला. पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु धुराचे लोट आणि ज्वालांमुळे ते शक्य झाले नाही. घरातील बरंच सामान जळून खाक झाल्या आणि मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरीही गोमातेचा आशीर्वाद आणि देवाची कृपा यांमुळे घरातील सर्व सदस्य आणि गोठ्यातील गाई सुरक्षित राहिल्या. झालेले नुकसान भरून येणारे नसले तरी आम्ही नियतीच्या या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जात आहोत. 

 अग्निशामक दलाच्या जवानांनी धुरात शिरून शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेगाने कारवाई केल्यामुळे ही आग मुख्य गोशाळेपर्यंत आणि गोठ्यातील जनावरांपर्यंत पोहोचू शकली नाही व जीवितहानी टळली. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अधिकृत तपासासाठी पोलीस आणि वीज खात्याला पत्रव्यवहार करून पाचारण करण्यात आले आहे.

दुर्घटनेची बातमी समजताच आज स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तारी कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शेट म्हणाले, कमलाकर तारी हे गेली अनेक वर्षे निष्ठेने गोसेवेचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या राहत्या घरावर ओढवलेले हे संकट अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. सुदैवाने गोमाता आणि घरातील सर्व सदस्य सुखरूप आहेत. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तारी कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. या कठीण प्रसंगात संपूर्ण मयेवासीय आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

दरम्यान मये मतदारसंघातीलच पिळगाव-सरमानस भागात सार्वजनिक रस्त्यावरील चिखलाच्या समस्येवरून आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. सेसा वेदांता कंपनीच्या खनिज वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे अपघात दररोज घडत होते. या समस्येची दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी कंपनीला नोटीस बजावून १५ दिवसांच्या आत रस्ता स्वच्छ करण्याचे आणि चिखलाची विल्हेवाट लावण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतरही कंपनीने कोणतीही स्वच्छता मोहीम हाती न घेतल्याने, संतप्त झालेल्या आमदारांनी स्वतःची गाडी थेट रस्त्यात आडवी लावून सेसा वेदांताची खनिज वाहतूक ठप्प केली.

यादरम्यान बोलताना आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कंपनी प्रशासनाला कडक शब्दांत फटकारले. कंपनी प्रशासनाने उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक पंचायतीच्या आदेशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावरील चिखलामुळे रोज दुचाकीस्वार पडत असून सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी केवळ स्वतःच्या नफ्याचा विचार करत असून स्थानिकांच्या आरोग्याची पर्वा करत नाही. जोपर्यंत सेसा वेदांता कंपनी रस्त्याची योग्य साफसफाई करत नाही आणि चिखल रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणी करत नाही, तोपर्यंत या मार्गावरून खनिज वाहतूक सुरू करू दिली जाणार नाही, असा थेट इशारा आमदार शेट यांनी दिला. स्थानिक सरपंच व पंचायत सदस्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला. 


हेही वाचा
सर्व पहा