जमीन हडप प्रकरणात ईडीचे गोवा अन् कारवार असे सात ठिकाणे छापे

जमीन हडप आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने मुख्य सूत्रधार सिद्दीकी खान, माजी नगरसेवक तारक आरोलकर व इतरांशी संबंधित गोवा आणि कारवारमधील एकूण ७ ठिकाणी छापे टाकून कारवाई तीव्र केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 mins ago
जमीन हडप प्रकरणात ईडीचे गोवा अन् कारवार असे सात ठिकाणे छापे

पणजी : गोव्यातील जमीन हडप आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपली कारवाई अत्यंत तीव्र केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान, म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तारक आरोलकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी संबंधित गोवा तसेच कर्नाटकातील कारवार येथील एकूण सात ठिकाणी ईडीच्या पथकांनी मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले. सायंकाळपर्यंत हे व्यापक धाडसत्र सुरू होते.


या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणांवरून जमिनींच्या खरेदी-विक्रीची दस्तऐवज, आर्थिक व्यवहारांच्या संबंधित कागदपत्रे आणि कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्ह्स ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी सुरू केली. जमीन हडप प्रकरणाशी संबंधित संशयास्पद पैशांच्या व्यवहारांचा आणि आर्थिक गैरव्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या छापेमारीत नेमके काय हाती लागले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


मूळ कर्नाटकातील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय सिद्दीकी खान उर्फ सुलेमान खान याला ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने १६ जुलै रोजी मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक केली होती. ईडीच्या तपासात या सिंडिकेटकडून बनावट व जुन्या तारखांचे विक्रीखत तसेच मालकी हक्काचे दस्तऐवज तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती अथवा पूर्वजांच्या नावांचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे बनवण्यात आली आणि अधिकृत जमीन नोंदींमध्ये फेरफार करून मौल्यवान जमिनींची मालकी आरोपी व त्यांच्या साथीदारांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे.


या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना म्हापसाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांचाही या जमीन हडप प्रकरणात थेट सहभाग असल्याचे समोर आले. दरम्यान, ईडीने आज मंगळवारी सुलेमान, आसिफ सौदागर या दोघांच्या घरासह म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याच्या म्हापसा येथील कार्यालयावर ईडीचा छापा टाकण्यात आला. या प्रकरणी गोव्यात सहा तर कारवार मधे एका ठिकाणी छापा सुरु आहे.


काही दिवसांपूर्वीच गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी आरोलकर यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या ते गुन्हे शाखेच्या ताब्यात असतानाच, त्यांच्या म्हापसा येथील 'साई डेव्हलपर्स' या कार्यालयावर ईडीने आज अचानक छापे टाकले. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्ह्सची झाडाझडती सुरू केली.


गोव्यात सहा आणि कारवारमध्ये एका ठिकाणी ही कारवाई पार पडली असून या छाप्यातून कोणते नवीन पुरावे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा