पणजी : राज्यात सध्या पाणी साठवण क्षमता कमी आहे. मात्र यासाठी जलस्त्रोत आणि पेयजल खात्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये तीन नवीन धरणे बांधणे, आवश्यक ठिकाणी पाणी पम्प करून पुन्हा धरणात सोडणे असे विविध उपाय केले जात आहेत. पेयजल खात्यातर्फे जुन्या वाहिन्या बदलणे, नवीन शुद्धीकरण प्रकल्प उभारणे अशा उपाययोजना केल्यास पुढील वर्षापर्यंत राज्यात २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचे जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिरोडकर म्हणाले की. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आम्ही सत्तरी, सांगे आणि शिरोडा तालुक्यात तीन नवीन धरणे बांधणार आहोत. यासाठीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. त्या भागातील मृदा चाचणी करणे, वन तसेच पर्यावरण खात्याची परवानगी घेणे अशी कामे सुरू झाली आहेत. सर्व काही सकारात्मक झाल्यास पुढील ६ महिने ते एक वर्षाच्या कालावधीत ही धरणे बांधण्याचा आमचा प्रयत्न असेल. या धरणांमुळे राज्याच्या एकूण पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होणार आहे.
ते म्हणाले, याआधी साळावलीतील पाणी कालव्यांना सोडले जायचे. मात्र आम्ही आता कुशावती नदीतून पाणी पंप करून दवर्ली येथे सोडणे सुरू केले आहे. येथून पुढे ते वेर्णा येथे पुरवण्यात येत आहे. यामुळे साळावलीतील सुमारे २०० एलएडी पाण्याची बचत होत आहे. याशिवाय आम्ही पंचवाडी आणि साळावली धरण रिचार्ज करत आहोत. म्हणजेच या धरणातून सोडलेले पाणी ५०० मीटर अथवा १ किमीच्या आत पंप केले जात आहे. असे पंप केलेले पाणी पुन्हा धरणात अथवा कालव्यात सोडले जात आहे.
याशिवाय धरणाच्या खाली झिरपणारे किंवा झऱ्यांमधील पाणी पंप करण्याचा आमचा विचार सुरू आहे. याद्वारे १०० ते ४०० एमएलडी पाणी मिळू शकेल. कालव्यांना अथवा बागायतींना पाणी खुल्या पद्धतीने न सोडता ते वाहिन्यांद्वारे सोडले तरी देखील पाण्याची बचत होऊ शकेल. याबाबत देखील आमचा विचार सुरू आहे.
आम्ही ओपा प्रकल्पाला आणखी ५० एमएलडी पाणी पुरवू शकतो. यासाठी पेयजल खात्याने येथे नवीन प्रकल्प उभारला पाहिजे. सध्या सांगे येथे शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे १०० एमएलडी पाणीपुरवठा होऊ शकतो असे शिरोडकर यांनी सांगितले.
गाळ काढण्याचे काम
शिरोडकर यांनी सांगितले की, अंजुणे धरणातील गाळ उपसा संबंधी आम्ही केंद्राकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर आम्हाला येथील गाळ काढता येईल. यामुळे येथील पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.


