
पणजीः रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षामध्ये (Revolutionary Goans Party) गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाने आता उग्र रुप घेतले आहे. आणि वाद आता पोलीस स्थानकात पोहोचला आहे. आरजीपी वीरेश बोरकर गटाच्या सदस्यांनी आरजीपीचे पदाधिकारी विश्वेश नाईक आणि अजय खोलकर यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानी आणि पक्षाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पणजी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे.
पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांना पाठवलेल्या निधीच्या गैरवापराविषयी असंतोष व्यक्त करणारी आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांची एक चॅट समोर आली आहे. आमदार वीरेश बोरकर यांचे पीए लिसोयो रोन्कोन आणि पक्षातून काढलेले नेते सॅम नाईक, डॅगली फर्नांडीस, मॅल्विन डिसिल्वा यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. मंगळवारी आरजीपीचे अजय खोलकर यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर हा वाद पु्न्हा वाढला आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर बोलताना लिसियो रोन्कोन यांनी सांगितले की, १६ जूनला आमच्या १० सदस्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. पक्षातून बाहेर काढत असताना ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन स्पष्टीकरण मागावे लागते. ही प्रक्रिया न करता आम्हाला बेकायदेशीरपणे पक्षातून बाहेर काढले.
आम्ही सर्वांनी पक्षासाठी खूप काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. जेव्हा आम्ही आर्थिक स्थितीविषयी प्रश्न विचारले तेव्हा प्रत्येक वेळी आम्हाला वेबसाईटवर टाकणार असे सांगितले. साडेचार वर्षे झाली जेव्हा आम्ही आर्थिक प्रश्नाविषयी बोलतो तेव्हा कधीच उत्तर मिळत नाही. सर्व वेबसाईटवर मिळणार असे सांगतात. पण अजून पर्यंत उत्तर न मिळाल्याने पुन्हा प्रश्न केल्यावर त्यांनी तांत्रिक त्रुटींमुळे मार्चमध्ये वेबसाईट बंद केली. आता जुलै सुरू झाला तरी आमची वेबसाईट चालत नाही, असा आरोप रोन्कोन यांनी केला.
हा वाद सुरू झाला तेव्हा विश्वेश नाईक यांनी सर्व मिडियाला एक व्हॉट्स अॅप मेसेज करून माझे नाव घेत लिसीयो रोन्कोन, आदित्य देसाई यांनी आरजीपी पक्ष संपवला असा आरोप केला. विश्वेशने कुठल्या आधारावर ही मेसेज घातली. कसलाच पुरावा नसताना बोलल्यास हा अब्रुनुकसानीचा गुन्हा ठरतो, असा दावा रोन्कोन यांनी केला.
माझ्यावर आरोप केल्यानंतर जे १० सदस्य त्यांना प्रश्न विचारत होते, त्यांनाही दोष देऊ लागले. हल्लीच वीरेश बोरकर यांच्यावर आरोप करून त्यांना गद्दार म्हटले. जे पदाधिकारी प्रश्न विचारतात तसेच जबाबदारी किंवा पारदर्शकता मागतात त्यांना बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप रोन्कोन यांनी केला.
हा वाद आतल्याआत संपवायला हवा होता. पण आमच्याच पदाधिकाऱ्यांनी हा वाद उजेडात आणाला. आता आम्हाला बाहेरून लढा द्यावा लागणार असे वाटते. आमचे शुभेच्छुक आणि समर्थकांनी त्यांना प्रश्न करावेत. हा पक्ष दोघातिघांनी उभा केलेला नाही तर प्रत्येक सदस्याचे त्यात योगदान आहे. पण सध्या दोघेतिघेच सदस्य पक्ष चालवत आहेत, अशी टीका रोन्कोन यांनी केली.
निधीविषयी स्पष्टीकरण मागणारे चॅट व्हायरल
आरजीपीचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांचे एक चॅट उजेडात आले आहे. त्यात एक सदस्य त्यांनी पक्षाच्या फंडासाठी दिलेल्या १ लाख रुपयांचा हिशोब नाईक यांना विचारतात. त्यात नाईक म्हणतात की त्यांनी हा हिशोब पक्षाचे खजिनदार अजय खोलकर यांना विचारावा.