Home >> देश -परदेश >> प. बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या; मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार

प. बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या; मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार

चार जणांना अटक; "गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली" म्हणत आरोपीच्या आईची तीव्र प्रतिक्रिया

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
प. बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या; मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे ११ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी प्रभाष मंडल पोलीस चकमकीत ठार झाला. (Bengal rape-murder accused killed in police encounter). घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी नेले असताना त्याने एका पोलिसाचे शस्त्र हिसकावून गोळीबार केला.  आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपीच्या मृत्यूनंतर त्याची आई संध्या मंडल यांनी, "त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली. मी आई म्हणून दुःखी आहे, पण त्याच्या कृत्याची शिक्षा झाल्याचे समाधान आहे," अशी प्रतिक्रिया दिली. "मला त्याचा मृतदेहही पाहायचा नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रभाष हा अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याचे सांगितले.

सीसीटीव्हीमुळे तपासाला मिळाला धागा

बारुईपूरमध्ये रविवारी ११ वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी बेपत्ता होण्यापूर्वी प्रभाष मंडल तिच्यासोबत दिसल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पोत्यात भरून तलावात फेकण्यात आले. शवविच्छेदनात तिच्या फुफ्फुसात पाणी आढळल्याने ती तलावात फेकली तेव्हा जिवंत असल्याचे समोर आले.

चार आरोपींना अटक

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्यावर हत्या, सामूहिक बलात्कार तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास सहा सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) करत आहे.

हिंसक आंदोलनानंतर कारवाई

या घटनेनंतर बारुईपूरमध्ये संतप्त नागरिकांनी मोठे आंदोलन केले. संशयावरून एका व्यक्तीला जमावाने ठार मारले.  अनेक ठिकाणी ‘रास्ता रोको’ व जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणखी अनेकांची ओळख पटवून कारवाई सुरू असल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्र्यांची न्यायाची ग्वाही

पश्चिम बंगालचे  मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात विलंब झाला का, याबाबतही अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.  तपासात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा