'सिंधू नदीच्या पाण्याच्या हक्कावर तडजोड नाही; सर्व आघाड्यांवर लढण्यास तयार' :पाकिस्तान

इस्लामाबाद : सिंधू जलकरार (Indus Waters Treaty) स्थगित ठेवण्याच्या भारताच्या भूमिकेनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तान सिंधू नदीच्या पाण्याच्या हक्कावर कोणतीही तडजोड करणार नाही आणि आवश्यक असल्यास सर्व आघाड्यांवर लढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत म्हटले.
भुट्टो यांनी भारतावर सिंधू नदीचे पाणी 'शस्त्र' म्हणून वापरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, "पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे. सिंधू नदीवरील आमच्या हक्कांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही," असे स्पष्ट केले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि कायमस्वरूपी पाठिंबा थांबवल्याशिवाय हा करार पूर्ववत केला जाणार नाही.
यापूर्वी पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसादिक मलिक यांनीही भारताला इशारा देत, पाकिस्तानच्या वाट्याच्या पाण्यावर दावा करणाऱ्यांचे "हात तोडू" अशी वादग्रस्त भाषा वापरली होती. पाकिस्तान आपल्या पाण्याच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
भारताने २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. सिंधू जलकरार स्थगित ठेवला आहे. भारताचा ठाम दावा आहे की, पाकिस्तानने आपल्या भूमीवरून सुरू असलेल्या सीमापार दहशतवादाच्या कारवायांवर प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई केल्याशिवाय करारावरील स्थगिती उठवली जाणार नाही.