Home >> देश -परदेश >> इन्स्टाग्राम रीलमुळे फुटले बिंग; १० लाखांचे चोरीचे दागिने घालून बनवला व्हिडिओ

इन्स्टाग्राम रीलमुळे फुटले बिंग; १० लाखांचे चोरीचे दागिने घालून बनवला व्हिडिओ

डायमंडचे महागडे दागिने बाजारात विकता न आल्याने मोलकरणीने हौसेपोटी बनवली होती रील

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
इन्स्टाग्राम रीलमुळे फुटले बिंग; १० लाखांचे चोरीचे दागिने घालून बनवला व्हिडिओ

देहराडून : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि 'रील' बनवण्याचा क्रेझ तरुणाईपासून सर्वच वयोगटांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकदा स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी अनेकजण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, उत्तराखंडची राजधानी देहराडूनमध्ये रील बनवण्याचा हाच नाद एका महिलेला थेट तुरुंगाच्या कोठडीत घेऊन गेला आहे. एका मोलकरणीने वर्षभरापूर्वी मालकिणीच्या घरातून चोरलेले तब्बल १० लाख रुपयांचे मौल्यवान हिऱ्यांचे दागिने परिधान करून इन्स्टाग्रामवर रील बनवली. या एका चुकीमुळे एक वर्षापूर्वी झालेल्या मोठ्या चोरीचा छडा लागला आहे.

देहराडून येथील आयटी पार्क परिसरातील 'सिक्का किमाया ग्रीन्स'मध्ये राहणाऱ्या नितीशा वत्स यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुमारे एका वर्षापूर्वी त्या जाखन येथील दून रिपब्लिक अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होत्या. त्यावेळी त्यांच्या घरातून एकदिवस डायमंडच्या दोन अंगठ्या, सोन्याची एक चेन आणि एक डायमंड हार्ट पेंडेंट गायब झाले होते. या दागिन्यांची किंमत साधारण १० लाख रुपये होती. त्यावेळी त्यांनी घरात काम करणाऱ्या विमला देवी या घरगुती सहायिकेवर संशय व्यक्त केला होता. मात्र, विमलाने इतक्या कमालीच्या आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे पोलिसांकडे जाण्याची तयारी दर्शवली की, नितीशा वत्स यांचा तिच्यावरील संशय दूर झाला. आपल्यालाच दागिने ठेवण्याची जागा आठवत नसावी, असा विचार करून त्या शांत बसल्या.

परंतु, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कधी ना कधी एखादी चूक नक्कीच करतो. या प्रकरणातही तसेच घडले. चोरी केलेले दागिने अत्यंत महागडे असल्याने नोकराणी विमला देवी त्यांना बाजारात विकू शकली नाही. अखेर दागिन्यांचा मोह आवरत नसल्याने तिने ते दागिने स्वतः परिधान केले आणि त्यावर एक इन्स्टाग्राम रील बनवून ती व्हिडिओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केली. नितीशा वत्स यांच्या एका परिचिताने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहिला आणि त्यांना विमलाच्या गळ्यातील आणि हातातील दागिन्यांबाबत माहिती दिली. नितीशा यांनी स्वतः तो व्हिडिओ आणि त्यातील फोटो बारकाईने तपासले असता, ते दागिने त्यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकार समोर येताच नितीशा यांनी तात्काळ राजपूर पोलीस ठाण्यात विमला देवीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता विमला देवीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. मालकिणीच्या खोलीतील लॉकरमधील दागिने पाहून मनात लालच निर्माण झाल्याने वर्षभरापूर्वी संधी साधून ही चोरी केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी विमलाच्या घरातून १० लाख रुपयांचे संपूर्ण दागिने हस्तगत केले असून तिला अटक केली आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीची हाव अखेर या या मोलकरणीला महागात पडली आहे.

हेही वाचा
सर्व पहा