समितीकडून तपासाचे आदेश

डेहराडून : अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर आता बद्रीनाथ धामातील अर्पण आणि देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबतही चोरी व अपहाराच्या आरोपांची चर्चा सुरू झाली आहे. (After Ayodhya, Badrinath Dham Hit by Theft Claims; Probe Ordered) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आरोपांची गंभीर दखल घेत बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (BKTC) चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे.
सोशल मीडियावर एका कर्मचाऱ्याला अध्यक्षांचा ‘वैयक्तिक सचिव’ म्हणून संबोधण्यात आल्याच्या दाव्याचे खंडन करत द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, संबंधित व्यक्ती ही त्यांची वैयक्तिक सचिव नसून मंदिर समितीतील नियमित सरकारी कर्मचारी आहे.
चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रांगड यांनी सांगितले की, उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि संबंधित पक्षांच्या जबाबांच्या आधारे चौकशी समिती आपला अहवाल सादर करेल.
चौकशीत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती अधिनियम, १९३९ तसेच कर्मचारी आचारसंहितेअंतर्गत दोषींवर कायदेशीर आणि विभागीय कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तपास पूर्ण होईपर्यंत अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार न करण्याचे आवाहनही समितीने नागरिकांना केले आहे.