Home >> गोवा >> ‘गोवा काँग्रेस’ की भाजपचा ‘डमी’ पक्ष? वाचकांचा सवाल

‘गोवा काँग्रेस’ की भाजपचा ‘डमी’ पक्ष? वाचकांचा सवाल

‘चर्चेची वार्ता’मधून मांडली वाचकांनी मते : नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसला फरक पडणार

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
21 mins ago
‘गोवा काँग्रेस’ की भाजपचा ‘डमी’ पक्ष? वाचकांचा सवाल

पणजी: राज्यात ‘गोवा काँग्रेस’ नावाच्या नव्या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या नव्या पक्षाच्या उदयामुळे मूळ राष्ट्रीय काँग्रेसला (आयएनसी) फटका बसणार का, या प्रश्नावर ‘दै. गोवन वार्ता’ने आपल्या 'चर्चेची वार्ता' या विशेष उपक्रमांतर्गत वाचकांची मते मागवली. यात बहुतांश वाचकांनी हा पक्ष म्हणजे ‘मतांचे विभाजन’ करून सत्ताधारी भाजपला फायदा पोहोचवण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या १९ मे २०१४ च्या आदेशानुसार, लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम २९ए अंतर्गत कोणत्याही नव्या राजकीय पक्षाला आधीपासून अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त पक्षाच्या नावाचे ‘भाषांतर’ करून नवीन नाव घेता येत नाही. जनतेचा गोंधळ उडू नये आणि जुन्या पक्षाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा नव्या पक्षाला घेता येऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे या पक्षाला नाव बदलावेच लागेल.
नरेंद्र रायकर


गोवा काँग्रेस हा पक्ष ‘डमी पक्ष’ म्हणून उभा करण्यात आला आहे. काँग्रेसला शह देऊन भाजपचा विजय सुकर करण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे, कारण भाजपला सध्या आपली ग्राउंड रिअॅलिटी पूर्ण माहीत आहे.
विशांत ऐनापूरकर


हा फक्त निवडणूक लढवण्यासाठी आणि मते खाण्यासाठी तयार केलेला ‘व्होट ब्रेकर’ पक्ष आहे, जो भाजपला जिंकण्यास मदत करेल. काँग्रेसमधील अंतर्गत नेतृत्वबदलाचा राग आणि पक्षातून ब्लॅकलिस्ट झालेल्या नेत्यांनी (उदा. पाटकर, चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या, लोबो पती-पत्नी, २०२२ मधील पक्षबदलू आमदार) घेतलेला हा सूड आहे.
मार्क अल्वारेस


रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी अपयशी ठरल्यानंतर आता भाजपने उघडलेले हे दुसरे ‘फेक अकाऊंट’ आहे.
रमा गावकर


हा पक्ष भाजप आणि गोवा फॉरवर्डने अर्थपुरवठा करून उभा केला आहे.
सेबी लापेरी


जर ‘गोवा काँग्रेस’ने पारंपरिक काँग्रेसच्या मतदारांमध्ये घुसखोरी केली, तर निश्चितच राष्ट्रीय काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा दुसऱ्या पक्षांना मिळेल. राजकारणात नवा पक्ष हा प्रयोग असतो, त्याचा निर्णय जनताच घेईल.
निलेश नाईक


नाही, कोणताही फरक पडणार नाही. मतदारांना आता चांगलेच समजले आहे की मतांच्या विभाजनामुळे निवडणुकीची गणिते कशी बिघडतात.
दिलीप गावस


गोव्यात यापूर्वीही असंतुष्टांनी राजीव काँग्रेस, युजीडीपी, सेव्ह गोवा आणि गेल्या वेळी तृणमूल काँग्रेससारखे प्रयोग करून काँग्रेसला पाडण्याचा प्रयत्न केला. पण गोव्यातील सुज्ञ मतदार नेहमी काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला आहे. विरोधी पक्ष यांना मदत करत असला तरी जनता जागी आहे.
जगन्नाथ देसाई


ही सत्ताधाऱ्यांच्या स्क्रिप्टनुसार काम करणारी ब्रिटिशांची ‘फोडा आणि राज्य करा’ अशी नीती आहे. अन्यथा, इतके दिवस हे ‘गोवा काँग्रेस’वाले कुठे झोपले होते?
संजय बर्डे

काहीच फरक पडणार नाही, सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. उद्या ‘गोवा भाजप’ नावाचा पक्ष आला तरी मूळ भाजप त्यांना विकत घेईल किंवा मोडीत काढेल. २०२७ च्या निवडणुकीत भाजपच जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
साईनाथ देसाई


नाही, काही फरक पडणार नाही. कारण गोवा काँग्रेस असो वा भारतीय काँग्रेस, कोणाचेही आमदार निवडून आले तरी ते शेवटी भाजपमध्येच जाणार आहेत.
वर्धन जठार


ही केवळ एक नवे ‘स्वीट मार्ट’ उघडल्यासारखे आहे. मात्र, निवडणूक आयोगाने मान्यता दिली आणि यांचे १-२ आमदार निवडून आले, तर हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करतील यात शंका नाही. राष्ट्रीय काँग्रेसला थोडा फरक पडू शकतो.
तुषार गायतोंडे


बाटली बदलली तरी आतील दारूत काही फरक पडणार आहे काय?
अनंत साळपे


गोवा फॉरवर्ड या पक्षासोबत युती करेल, कारण या पक्षाचे हाय कमांड गोव्यातच असेल, ज्यामुळे सरकार चालवणे सोपे जाईल.
मनोज कवठणकर


मग आता ‘एनसीपी’ या नावाचा अर्थ काय उरला?
मॅकबेथ परेरा


विली (विल्फ्रेड डिसोझा), काँग्रेस आणि मग नॅशनल काँग्रेस... हा इतिहास आहे.
दयानंद केरकर


सध्या गोव्याच्या जनतेला काय राजकारण चालले आहे, याने काही फरक पडत नाही. त्यामुळे कितीही पक्ष स्थापन झाले तरी चालतील.
शंकर शेट्ये


हा प्रकार ठाकरे पक्ष, तृणमूल किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखाच आहे.
मधुसूदन पाठक


वेगळा पक्ष म्हणजे वेगळी चूल. हे पावसाळ्यात उगवलेल्या अळंब्यासारखे (मशरूम) आहेत, नंतर नाहीसे होणार.
गजानन नाईक


फायदा तर काहीच नाही, उलट मतांचे विभाजन होईल.
मधुसूदन बोरकर


विनाश काले विपरीत बुद्धी!
रवींद्र पाटील


जनता या दोन्ही पक्षांना योग्य धडा शिकवणार.
चरणजित सप्रे


‘प्यार का वादा ५०-५०, क्या है इरादा ५०-५०...’ अशीच यांची अवस्था आहे.
संजय पै

हेही वाचा
सर्व पहा