मंदार सुर्लकर खून प्रकरण : पुढील सुनावणी ९ जुलै रोजी

पणजी : वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना लवकर मुक्त करण्याची शिफारस करताना राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी दाखल केलेल्या आक्षेपावर चर्चा केली नाही. तसेच त्यांची बाजू जाणून घेतली नाही. याशिवाय मंडळाने आरोपींच्या मानसिक स्थितीबाबत तज्ञाचा अहवाल विचारात घेतला नाही, असा युक्तिवाद अॅड. दीपक गावकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे.
बाल न्यायालयाने २३ जून २०१४ रोजी रोहन पै धुंगट, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि जोविता रायन पिंटो या चार जणांना मंदारचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या प्रकरणात अल सलेटा बेग हा माफीचा साक्षीदार बनल्यामुळे त्याला शिक्षा दिली नव्हती. दोषींनी या शिक्षेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु उच्च न्यायालयाने ४ मार्च २०१९ रोजी त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर १८ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने आरोपींना लवकर मुक्त करण्यासाठी शिफारस दिली. त्यानंतर राज्य सरकारने बाल न्यायालयाचे मत व इतर मुद्द्याची दखल घेऊन १० मे २०२१ रोजी आरोपींना लवकर मुक्त करण्यास नकार दिला. त्यानंतर अनेकदा वरील आरोपींनी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या. न्यायालय, बाल न्यायालय तसेच सरकारकडे मंदारच्या वडिलांनी आक्षेप घेतले. याच दरम्यान राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने २१ मे २०२५ रोजी आरोपींना लवकर सोडण्यासाठी शिफारस केली.
वरील शिफारस देण्यापूर्वी मंदारच्या वडिलांनी मंडळाकडे वेगळा अर्ज करून विरोध दर्शविला होता. यावर कोणतीच बाजू मंडळाने दिली नाही. त्यानंतर मंडळाच्या शिफारसला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅड. दीपक गावकर यांनी वरील मुद्दे उपस्थित केले. तसेच आरोपींना लवकर मुक्त केल्यानंतर ते गुन्हेगारी कृत्यात सहभाग होऊ शक्यतात की नाही तसेच त्यांच्या मानसिक स्थितीबाबत कोणताच अहवाल विचारात घेतला नसल्याचा युक्तिवाद केला.
५० लाखांच्या खंडणीसाठी झाला होता खून
वास्को येथील मंदार सुर्लकर याचे १४ ऑगस्ट २००६ रोजी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. हा कट आरोपी रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोविता रायन पिंटो आणि अल सलेटा बेग यांनी आखला होता. त्यानंतर मंदारचा खून करून त्याचा मृतदेह फोंडा येथील आर्ला-केरी येथे फेकण्यात आला होता. मंदारचा मृतदेह आढळून आल्यानंतर तत्कालीन पणजी पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती.