Home >> गुन्हे >> आरोपींच्या सुटकेच्या शिफारशीला वडिलांचे न्यायालयात आव्हान

आरोपींच्या सुटकेच्या शिफारशीला वडिलांचे न्यायालयात आव्हान

वास्कोतील मंदार सुर्लकर खूनप्रकरणी आज सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
आरोपींच्या सुटकेच्या शिफारशीला वडिलांचे न्यायालयात आव्हान

पणजी : वास्को येथील मंदार सुर्लकर खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपींना राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने लवकर मुक्त करण्यासाठी शिफारस दिली होती. या शिफारशीला मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार ३ रोजी होणार आहे.
या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर बाल न्यायालयाने २३ जून २०१४ रोजी रोहन पै धुंगट, शंकर तिवारी, नफियाज शेख आणि जोविता रायन पिंटो या चार जणांना मंदार सुर्लकरच्या खूनप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. या प्रकरणात अल सलेटा बेग हा माफीचा साक्षीदार बनल्यामुळे त्याला शिक्षा झाली नव्हती. दोषींनी या शिक्षेला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु उच्च न्यायालयाने ४ मार्च २०१९ रोजी त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
त्यानंतर १८ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने वरील आरोपींना लवकर मुक्त करण्यासाठी शिफारस दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने बाल न्यायालयाचे मत व इतर मुद्द्याची दखल घेऊन १० मे २०२१ रोजी आरोपींना लवकर मुक्त करण्यास नकार दिला. याला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना १४ वर्षे झाले नसल्यामुळे याचिका फेटाळून लावली.
याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर अनेक न्यायालयीन खटले दाखल केल्यानंतर राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाने २१ मे २०२५ रोजी आरोपींना लवकर सोडण्यासाठी शिफारस केली. याला मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मंडळाच्या या ताज्या शिफारशीनंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा बाल न्यायालयाचे अधिकृत मत जाणून घेतले. यावेळीही बाल न्यायालयाने आरोपींना मुदतपूर्व मुक्त करण्यास स्पष्ट नकार दिला. बाल न्यायालयाच्या या भूमिकेनंतर राज्य सरकारने आरोपींची लवकर सुटका करण्यास नकार दिला आहे. याला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
५० लाखांच्या खंडणीसाठी झाले होते अपहरण
वास्को येथील मंदार सुर्लकर याचे १४ ऑगस्ट २००६ रोजी अपहरण करण्यात आले होते. मंदारच्या वडिलांकडून ५० लाख रुपयांची मोठी खंडणी उकळण्याचा कट आरोपी रोहन पै धुंगट, नफियाज शेख, शंकर तिवारी, जोविता रायन पिंटो आणि अल सलेटा बेग यांनी आखला होता. मात्र, त्यानंतर मंदारचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह फोंडा येथील आर्ला-केरी येथे आढळून आला होता. या प्रकरणी तत्कालीन पणजी पोलीस निरीक्षक महेश गावकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती.

हेही वाचा
सर्व पहा