Home >> गोवा >> राज्यात २४ तासांत पडझडीच्या ४६ घटना; ९ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान

राज्यात २४ तासांत पडझडीच्या ४६ घटना; ९ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान

अग्निशमन दलाची तत्परता : २० लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता वाचवली

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
03rd July, 12:11 am
राज्यात २४ तासांत पडझडीच्या ४६ घटना; ९ लाखांच्या मालमत्तेचे नुकसान

पणजी : राज्यात गेल्या २४ तासांत पावसाच्या तडाख्याने झाडे कोसळण्याच्या एकूण ४६ घटना घडल्या आहेत. या विविध घटनांमध्ये सुमारे ९ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य केल्याने सुमारे २० लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व घटना १ जुलै रोजी सकाळी ७ ते २ जुलै रोजी सकाळी ७ या कालावधीत घडल्या. यात सर्वाधिक प्रत्येकी ७ घटना पेडणे आणि फोंडा विभागात नोंदविण्यात आल्या. म्हापसा विभागात ६, जुने गोवे आणि पणजी विभागात प्रत्येकी ५, वाळपई विभागात ४, डिचोली विभागात ३, मडगाव आणि कुंकळ्ळी विभागात प्रत्येकी २, तर वास्को, कुंडई, वेर्णा, कुडतरी आणि काणकोण विभागात प्रत्येकी १ घटना नोंदविण्यात आली.

उत्तर गोव्यातील नुकसान

ताळगाव येथे एका घरावर झाड कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर १५ हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. आगशी येथे वीजवाहिनीवर माड कोसळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ६० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. बस्तोडा येथे दोन वाहनांवर आणि एका घरावर झाड कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. आराडी-गिरी येथे एका घरावर झाड कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर २० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. तसेच आगशी येथेच एका शेडवर चिंचेचे झाड कोसळून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर २० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली.

मंदिरे आणि घरांवर पडली झाडे

भाटले-पेडणे येथे देवगिरीश्वर मंदिरावर झाड कोसळून १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ३० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. वाळपईतील वेळूस पुलाजवळ निरफणसाचे झाड घरावर कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आणि तितक्याच किमतीची मालमत्ता वाचविण्यात आली. जुने गोवे येथे वडाचे झाड कोसळून एका शेडचे आणि मोटारीचे मिळून ५.३० लाख रुपयांचे नुकसान झाले, तर ७ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. पिलार चर्चजवळ वीजवाहिनी व कंपाऊंडवर झाड कोसळून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर १० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली.

दक्षिण गोवा अन् फोंड्यातील घटना

१) शांतीनगर, फोंडा येथे एका मोटारीवर, इमारतीवर आणि वीजवाहिनीवर आंब्याचे झाड कोसळून २ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर १० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

२) वाणेली-कोलवा येथे वीजवाहिनी आणि कंपाऊंडवर फणसाचे झाड कोसळून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली.

३) साकोर्डे येथे वीजवाहिनी आणि गोठ्यावर झाड कोसळल्याने तसेच बोरी येथे गोठ्यावर माड कोसळल्याने प्रत्येकी १० हजार रुपयांचे नुकसान झाले.

४) मडकई येथे एका घरावर झाड कोसळून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ४० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा