Home >> गोवा >> प्रत्येक पालिका, ग्रामपंचाय क्षेत्रात उभारणार ‘रॅपिड कंपोस्टिंग’ प्रकल्प!

प्रत्येक पालिका, ग्रामपंचाय क्षेत्रात उभारणार ‘रॅपिड कंपोस्टिंग’ प्रकल्प!

मुख्यमंत्र्यांची घोषणा : २४ ते ४८ तासांत ओल्या कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतात

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
03rd July, 11:57 pm
प्रत्येक पालिका, ग्रामपंचाय क्षेत्रात उभारणार ‘रॅपिड कंपोस्टिंग’ प्रकल्प!

डिचोली : राज्यातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शास्त्रीय आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी गोवा सरकार आता एक मोठे पाऊल उचलत आहे. राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टिंग’ प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर कचरा फेकण्याची प्रवृत्ती थांबवून त्याचे अवघ्या २४ ते ४८ तासांत सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठी राज्यभर विशेष अभियान राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी डिचोली येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन गोवा सरकार, ‘संपूर्णअर्थ’ आणि इंडिगो एअरलाईन्सच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टिंग’ प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. या वेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, वाढत्या शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापन हे मोठे आव्हान बनले आहे. आता कचऱ्याची केवळ विल्हेवाट लावण्याऐवजी त्याचे मूल्यवर्धन करून सेंद्रिय खत तयार करणे ही काळाची गरज आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे जैवविघटनशील (ओला) कचरा दूरवर वाहून नेण्याची गरज उरणार नाही. कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच परिसरात त्यावर प्रक्रिया होणार असल्याने वाहतूक खर्च, इंधनाचा वापर आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी या तंत्रज्ञानाची माहिती देताना सांगितले की, सर्वप्रथम वर्गीकृत ओल्या कचऱ्यात विशेष ‘जैवसंवर्धक’ मिसळले जाते. त्यानंतर ‘श्रेडर’ मशीनद्वारे त्याचे एकसमान मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण हवेशीर विंड्रोमध्ये २४ तास ठेवून त्यातील आर्द्रता नियंत्रित केली जाते. पुढील २४ तास ट्रे किंवा क्रेटमध्ये ठेवून प्रक्रिया पूर्ण केली जाते. अवघ्या २४ ते ४८ तासांत दुर्गंधीरहित, स्थिर आणि शेती-बागायतीसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत तयार होते. या प्रक्रियेमुळे प्लास्टिक, काच आणि धातू यांसारखा सुका कचरा दूषित होत नाही, ज्यामुळे त्याचा पुनर्वापर करणे सोपे होते. तसेच मिथेन वायूचे उत्सर्जन कमी होत असल्याने भविष्यात कार्बन क्रेडिटच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.
घनकचरा व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर यांनी सांगितले की, अशा मोठ्या प्रमाणावर ‘निसर्गरुणा रॅपिड कंपोस्टिंग’ तंत्रज्ञान प्रत्यक्ष जमिनीवर राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गोव्याचा हा पॅटर्न देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल. तर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या उपक्रमाचे कौतुक करत यामुळे पालिका आणि पंचायत स्तरावरील कचऱ्याचा प्रश्न सुटून कचरा व्यवस्थापन नेटके होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यावेळी शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे, घनकचरा व्यवस्थापन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष हडकोणकर, पंचायत संचालक दशरथ रेडकर, नगर प्रशासन संचालनालयाचे संचालक ब्रिजेश मणेरीकर, पणजी महानगरपालिकेचे आयुक्त क्लेन मेडेरा, पंचायत उपसंचालक, मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी, डिचोलीचे माजी नगरसेवक आणि 'संपूर्णअर्थ फाउंडेशन'चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वागत केले.
‘स्वच्छ गोवा-हरित गोवा’ संकल्पनेला बळ
हा प्रकल्प केवळ कचऱ्यापुरता मर्यादित नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्लीन इंडिया’ आणि राज्याच्या ‘स्वच्छ गोवा-हरित गोवा’ संकल्पनेला बळ देणारा आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि निवासी संकुलांमध्ये ही प्रणाली राबवण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि विशेष प्रशिक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा