
पणजी : मागील अनेक वर्षांपासून अयोध्या येथील राम मंदिरात चोरी होत आहे. भक्तांनी दान दिलेली आभूषणे, रामाच्या पादुका, हार व रोख रक्कम चोरीला गेली आहे. उत्तर प्रदेश तसेच केंद्रातील भाजप सरकार हे प्रकरण दाबू पाहत आहे. आम्ही आवाज उठल्यानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली. सध्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना भाजपकडून संरक्षण देण्यात येते. या मोठ्या सूत्रधारांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली.
शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केजरीवाल म्हणाले की, राम मंदिरातील चोरीचा प्रकार २०२१ पासून सुरू आहे. याबाबत आयबीने केंद्र सरकारला तब्बल बारा वेळेस अहवाल दिला होता. तरी देखील वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले. यामध्ये मंदिर ट्रस्ट मधील लोक गुंतले असण्याची शक्यता आहे.
मंदिर ट्रस्टने लोकांच्या दानातून मिळालेल्या रकमेचा वापर घोटाळ्यासाठी केला आहे. कमी दरातील जमिनी अधिक रक्कम देऊन विकत घेण्यात आल्या आहेत. एका प्रकरणात १४ कोटी रुपये किंमत असणारी जमीन ट्रस्टने ९५ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. येथील बांधकामाच्या कंत्राटामध्येही कमिशन घेण्यात आले आहे.
ते म्हणाले, नुकत्याच मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज नुसार येथे ४० दिवसात ७० वेळा चोरी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे समजल्यावर येथील प्रशासनाने मागील आठ महिन्याचे सीसीटीव्ही फुटेजच डिलीट केले. प्रशासनाने चोरीचे प्रकरण गंभीरपणे घेतली नव्हते. आम्ही तिथे जाऊन आंदोलन केल्यावर प्रशासनाला जागा आली. आता याप्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. मात्र केवळ लहान आरोपींना पकडण्यात आले आहे. मोठे आरोपी अद्याप मोकळे फिरत आहेत. दबाव वाढल्यावर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. मात्र या एसआयटीला कोणतेही अधिकार नाहीत.
लोकांच्या भावनांशी खेळ
गोव्यासह संपूर्ण देशातील सनातनी लोकांनी राम मंदिरासाठी दान, देणगी दिली होती. हेच पैसे आता चोरीला गेले आहेत. मात्र भाजपला याच्याशी काहीही घेणे देणे नाही. भाजप सरकारला भगवान रामाचा वापर केवळ मत आणि पैशासाठी करायचा आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला.
समविचारी पक्षांसोबत युती करण्याबाबत चर्चा नाही
समविचारी पक्षांसोबत युती करण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. याविषयी वाल्मिकी नाईक आणि गोव्यातील अन्य पदाधिकारी जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्यात येईल. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल गोव्यात आले असले तरी युती बाबत कोणतीही बैठक होणार नाही.