म्हापसा अग्निशमन दलाने वाचवले प्राण

पणजी : वागातोर येथे दारूची नशा कर्नाटक येथील एका पर्यटकाला भोवली. नशेत असताना तोल गेल्याने सुमारे ५० फूट खोल विहिरीत पडला. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून प्राण वाचवले. केतन राज असे या पर्यटकाचे नाव असून, बंगळुरू येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन राज हा आपल्या मित्रांसह वागातोर परिसरात फिरण्यासाठी आला होता. यावेळी दारूच्या नशेत असताना त्याचा तोल जाऊन तो जवळील खोल विहिरीत पडला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष बचाव साहित्याच्या सहाय्याने विहिरीत उतरून पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढले. या बचावकार्यात जवानांनी मोठी तत्परता आणि धाडस दाखवत पर्यटकाचे प्राण वाचवले. त्यानंतर केतन राज याला पुढील उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पर्यटकांनी मद्यप्राशनानंतर समुद्रकिनारे, विहिरी किंवा इतर धोकादायक ठिकाणी वावरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.