Home >> गोवा >> विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा पक्ष स्थापन होण्याची राजकीय परंपरा

विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा पक्ष स्थापन होण्याची राजकीय परंपरा

एक, दोन जागा जिंकून प्रस्थापितांना दणका : सध्या गोवा काँग्रेस पार्टी स्थापन करण्याच्या हालचाली

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
38 mins ago
विधानसभा निवडणुकीपूर्वी नवा पक्ष स्थापन होण्याची राजकीय परंपरा

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापू लागले आहे. राजकीय बैठका, बैठकांचे सत्र आणि राष्ट्रीय नेत्यांचे दौरे वाढत असतानाच, आता ‘गोवा काँग्रेस’ हा नवीन पक्ष स्थापन करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात नवा पक्ष स्थापन होणे आणि त्याने मुख्य पक्षांची गणिते बिघडवणे, ही काही गोमंतकीय राजकारणासाठी नवी गोष्ट नाही. यापूर्वीही अनेकवेळा नव्या पक्षांनी १-२ जागा जिंकून प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आहे.
२०१२ ते २०२२: ‘आरजीपी’पासून ‘गोवा विकास पार्टी’पर्यंतचा प्रवास
२०२२ (आरजीपी आणि तृणमूल): गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) या नव्या पक्षाची स्थापना झाली होती. या पक्षाला केवळ सांत आंद्रे या एकाच जागेवर विजय मिळवता आला, तरीही इतर अनेक मतदारसंघांत मोठी मते घेऊन त्यांनी मुख्यत्वे काँग्रेसला मोठा फटका दिला. याच निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ‘मगो’सोबत युती करून निवडणूक लढवली, मात्र त्यांना खातेही उघडता आले नाही.
२०१७ (गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’): २०१७ च्या निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना झाली आणि पहिल्याच फटक्यात त्यांचे ३ उमेदवार निवडून आले. याच निवडणुकीत ‘आम आदमी पक्षा’ने पहिल्यांदाच नशीब आजमावले; त्यांना जागा मिळाली नसली तरी अनेक मतदारसंघांत त्यांनी लक्षणीय मते घेतली.
२०१२ (गोवा विकास पार्टी): २०१२ च्या निवडणुकीपूर्वी मिकी पाशेको यांनी ‘गोवा विकास पार्टी’चे पुनरुज्जीवन केले. या पक्षाने नुवे आणि बाणावली या दोन जागांवर विजय मिळवून आपला प्रभाव दाखवला होता.
२००२ आणि २००७: ‘सेव्ह गोवा फ्रंट’ आणि ‘युगोडेपा’चा करिष्मा
२००७ (सेव्ह गोवा फ्रंट): मोपा विमानतळाला विरोध करण्याच्या मुख्य उद्देशाने चर्चिल आलेमाव यांनी ‘सेव्ह गोवा फ्रंट’ या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाने नावेली (चर्चिल आलेमाव) आणि कुडतरी (आलेक्स रेजिनाल्ड) या दोन जागांवर विजय मिळवला होता.
२००२ (युगोडेपा): २००२ च्या निवडणुकीत ‘युगोडेपा’ पक्ष पुनरुज्जीवित झाला आणि त्यांनी ३ मतदारसंघांत विजय मिळवला. यात ताळगावमधून बाबूश मोन्सेरात, कुठ्ठाळीमधून माथानी साल्ढाणा आणि बाणावलीमधून मिकी पाशेको हे युगोडेपाच्या तिकिटावर विजयी झाले होते.
१९९० चे दशक: गोवा राजीव काँग्रेस आणि राजकीय स्थित्यंतरे
१९९९ (गोवा राजीव काँग्रेस): १९९९ च्या निवडणुकीत गोवा राजीव काँग्रेस हा नवा पक्ष रिंगणात होता. या पक्षाकडून डॉ. विल्फ्रेड डिसोझा (साळगाव) आणि फ्रान्सिस डिसोझा (म्हापसा) हे दोन उमेदवार विजयी झाले. पुढे डॉ. विली यांनी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केला.
१९९४ (युगोडेपा): १९९४ च्या निवडणुकीपूर्वी चर्चिल आलेमाव यांच्या ‘युगोडेपा’ पक्षाने निवडणूक लढवून ३ जागांवर विजय मिळवला होता.
‘काँग्रेस’ नावाचा वापर करण्याची जुनीच परंपरा
गोव्यात ‘काँग्रेस’ या नावाचा वापर करून नवीन प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची परंपरा जुनीच आहे. १९८० च्या दशकानंतर दिवंगत डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी सर्वप्रथम ‘गोवा काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली होती आणि या पक्षाने १९८४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुढे १९९८ मध्ये डॉ. विली यांनीच पुन्हा ‘गोवा राजीव काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली, ज्याने १९९९ ची निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा आगामी निवडणुकीच्या तोंडावर ‘गोवा काँग्रेस’ नावाचा नवा पक्ष आकारास येत असल्याने, हा पक्ष आगामी निवडणुकीत कोणाचे पत्ते कट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा