Home >> गोवा >> गोव्यात दर विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पक्षाची स्थापना ठरलेलीच!

गोव्यात दर विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पक्षाची स्थापना ठरलेलीच!

नव्या पक्षांनी एक-दोन जागा जिंकून प्रस्थापितांना नेहमीच धक्का दिला आहे, हा आजवरचा इतिहास!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
गोव्यात दर विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्या पक्षाची स्थापना ठरलेलीच!

पणजी : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय बैठका तसेच राष्ट्रीय नेत्यांचे दौरे वाढत असतानाच, आता 'गोवा काँग्रेस पार्टी' हा नवीन पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गोव्यात प्रत्येक विधानसभा निवडणुकीपूर्वी एखादा नवीन पक्ष स्थापन होतोच, हा आजवरचा इतिहास आहे. या नव्या पक्षांनी नेहमीच एक-दोन जागा जिंकून प्रस्थापित मुख्य पक्षांना मोठा फटका दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता 'गोवा काँग्रेस पार्टी' स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आरजी' (रिव्होल्युशनरी गोअन्स) या पक्षाची स्थापना झाली होती. 'आरजी'ला केवळ सांत आंद्रे या एकाच जागेवर विजय मिळवण्यात यश आले; मात्र इतर अनेक मतदारसंघांमध्ये मोठी मते खेचून त्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. याशिवाय, २०२२ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनेही 'मगोप'सोबत (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) युती करून निवडणूक लढवली होती. मात्र, तृणमूलला गोव्यात एकही जागा मिळवता आली नाही. यापूर्वी, २०१७ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) आपले उमेदवार उभे केले होते. २०१७ ची विधानसभा निवडणूक 'आप'ने पहिल्यांदाच लढवली होती; त्यात त्यांना जागा मिळाल्या नसtableल्या, तरी काही मतदारसंघांत त्यांनी लक्षणीय मते घेतली होती.

२०१२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिकी पाशेको यांनी 'गोवा विकास पक्षा'ची स्थापना केली होती. तेव्हा नुवे आणि बाणावली या दोन जागांवर गोवा विकास पक्षाने विजय मिळवला होता. तर २००७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चिल आलेमाव यांनी 'सेव्ह गोवा फ्रंट' पक्षाची स्थापना केली. मोपा विमानतळाला विरोध करण्याच्या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी चर्चिल आलेमाव (नावेली) आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो (कुडतरी) या दोन जागांवर सेव्ह गोवा फ्रंटने विजय मिळवला होता.

२००२ च्या विधानसभा निवडणुकीत 'युगोडेपा' (UGDP - युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी) पक्ष पुनरुज्जीवित झाला आणि त्यांनी ३ मतदारसंघांत विजय मिळवला. ताळगाव (बाबूश मोन्सेरात), कुठ्ठाळी (माथानी साल्ढाणा) आणि बाणावली (मिकी पाशेको) हे उमेदवार युगोडेपाच्या तिकिटावर विजयी झाले होते.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत 'गोवा राजीव काँग्रेस' हा नवीन पक्ष रिंगणात उतरला होता. डॉ. विल्फ्रेड डिसोझा (साळगाव) आणि फ्रान्सिस डिसोझा (म्हापसा) हे दोन उमेदवार या पक्षाकडून विजयी झाले. नंतर डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) विलीन केला. त्याआधी, १९९४ च्या निवडणुकीपूर्वी चर्चिल आलेमाव यांच्या युगोडेपा पक्षाने निवडणूक लढवून ३ जागांवर विजय मिळवला होता.

थोडक्यात सांगायचे तर, निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात नवीन पक्ष तयार होणे आणि त्याने निवडणूक लढवणे, ही गोष्ट गोमंतकीय राजकारणासाठी अजिबात नवीन नाही.


हेही वाचा
सर्व पहा