Home >> ताज्या बातम्या >> विरोधकांच्या भूमिकेवर सां​गेतील समीकरणे अवलंबून

विरोधकांच्या भूमिकेवर सां​गेतील समीकरणे अवलंबून

विधानसभेचा आखाडा : सांगे

Story: संदीप मापारी |
53 mins ago
विरोधकांच्या भूमिकेवर सां​गेतील समीकरणे अवलंबून

सुभाष फळदेसाईंची मतदारसंघावर पकड
विरोधी पक्षांत अनेक उमेदवार इच्छुक
विरोधकांची एकी झाल्यास बदलू शकते चित्र
एसटी राजकीय आरक्षणावर ठरणार रणनीती


गोवन वार्ता
सांगे : सांगे मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. समाजकल्याण, पेयजल, जलवाहतूक आणि पुरातत्व अशी महत्त्वाची खाती सांभाळणारे सुभाष फळदेसाई यांनी या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. फळदेसाई यांच्यापूर्वी वासुदेव मेंग गावकर यांच्या रूपात दोन वेळा भाजपने हा मतदारसंघ काबीज केला होता. मात्र २०१७ मध्ये प्रसाद गावकर यांनी​ अपक्ष म्हणून येथे बाजी मारली होती. २०२७ च्या निवडणुकीची तयारी सुरू असताना या मतदारसंघात अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र विरोधकांची एकी झाली, तर विजयी होण्यासाठी फळदेसाईंना संघर्ष करावा लागू शकतो.


सुभाष फळदेसाई
१९६३ मध्ये सांगे आणि धारबांदोडा एकच तालुका होता. त्याेळी टॉनी फर्नांडिस सांगे तालुक्याचे पहिले आमदार होऊन मंत्री बनले. त्यानंतर वासुदेव मोरजकर दोन वेळा, मगोचे सदाशिव मराठे एक वेळा, काँग्रेसचे गुरुदास तारी एक वेळा, काँग्रेसचे पांडू वासू नाईक एकवेळा आमदार झाले. पुढे सांगे तालुक्याचे दोन भाग झाले. एक सांगे आणि दुसरा धारबांदोडा तालुका. १९७९ साली सांगे मतदारसंघात मगो पक्षाचे राणू अनंत प्रभूदेसाई विजयी झाले. १९९४ साली पुन्हा एकदा पांडू वासू नाईक दुसऱ्या वेळी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आणि बंडखोरी करून त्याने मंत्रिपद मिळविले. १९९९ मध्ये प्रभाकर गावकर हे भाजपचे पहिले आमदार निवडून आले. त्यानंतर वासुदेव मेंग गावकर हे भाजपच्या उमेदवारीवर दोन वेळा निवडून आले आणि २०१२ साली वासुदेव गावकर यांची तिकीट कापून सुभाष फळदेसाई यांना देण्यात आले. त्यावेळी फळदेसाई विजयी झाले. २०१७ च्या निवडणुकीत अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना मतदारांनी कौल दिला. २०२२ च्या निवडणुकीत सुभाष फळदेसाई १,४२९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. भाजपचे सुभाष फळदेसाई यांना ८,७२४ (३७.११ टक्के), अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांना ७,२९५ (३१.३१ टक्के), काँग्रेसचे प्रसाद गावकर यांना ४,६४४ मते (१९ टक्के), रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीचे सुनील गावकर यांना १,५०० (६.३८ टक्के), आम आदमी पक्षाचे अभिजीत देसाई यांना ८९४ (३.८१ टक्के), तृणमूल काँग्रेसच्या राखी नाईक यांना १८५ (०.८९ टक्के), राष्ट्रवादी काँग्रेसचे दोमासियो बार्रेटो यांना १७४ (०.७४ टक्के), तर अपक्ष उमेदवार रमेश वेलिंगकर यांना फक्त ९४ मते मिळाली होती.


प्रसाद गावकर
सावित्री कवळेकर यांनी ७,२९५ मते घेतली होती. यावेळी त्या रिंगणात उतरल्या, तर मतदार त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवतील, हे पहावे लागेल. पाच वर्षे सांगेचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करणारे प्रसाद गावकर हेही पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. २०२२ ची निवडणूक झाल्यापासून आरजीपीचा सांगे मतदारसंघात फारसा बोलबाला दिसला नाही. आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला, तर लोक कसा प्रतिसाद देतात, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. यावेळी अमित नाईक हेही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

राजेश गावकर

२०२७ च्या निवडणुकीत भाजपाचे आमदार तथा पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याबरोबर भाजपचे मंडळाध्यक्ष राजेश गावकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर शर्यतीत असल्याची चर्चा आहे. सांगे मतदारसंघात एकूण २६,६१४ मतदार आहेत. त्यात महिला १३,८९९ आणि पुरुष मतदार १२,७१५ आहेत. २०२७ च्या निवडणुकीत अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण पाहिजे, अशी मागणी जोर धरली आहे. एसटी समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर भाजपच्या विरोधात मतदान करणार असल्याचा इशारा नेत्रावळी येथे झालेल्या जाहीर सभेत एसटी समाजाने दिला आहे. आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यास पक्षाच्या निर्णयानुसार एसटी उमेदवारासाठी जाहीरपणे काम करणार असल्याचे सांगितले आहे.

सुरेश केपेकर

सांगे मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व आहे. मात्र पक्षातील नेत्यांमध्ये एकजूट नाही. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मतदारसंघात लक्ष घातल्यास नेत्यांमधील मतभेद दूर होऊ शकतात. गोवा फॉरवर्ड पक्ष सांगेत नवीन असल्याने पक्षाच्या नेत्यांना काम करावे लागणार आहे. विरोधकांची एकजूट झाल्यासच ते भाजपला टक्कर देऊ शकतात. २०२५च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या राजश्री गावकर फक्त १९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी भाजपला कठीण परिक्षम घ्यावे लागतील, हे निश्चित.

एसटी आरक्षणावर गणिते अवलंबून
राज्यात एसटी राजकीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किमान चार मतदारसंघ एसटींसाठी राखी​व ठेवावेत, अशी आग्रही मागणी होत आहे. सांगे मतदारसंघाचाही त्यात समावेश असू शकतो. एसटींसाठी सांगे मतदारसंघ आरक्षित झाला, तर सगळी गणिते बिघडणार आहेत. मात्र परिस्थिती कायम राहिली, तर भाजपतर्फे सुभाष फळदेसाई हेच पक्षाचे उमेदवार असू शकतात. गेल्या निवडणुकीत बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री यांनी अपक्ष निवडणूक लढवून फळदेसाई यांना चांगली टक्कर दिली होती. प्रसाद गावकर तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी विरोधातील उमेदवार कोण असतील, यावर भाजपची आणि सुभाष फळदेसाई यांची रणनीती ठरेल.
पायाभूत सुविधांवर फळदेसाईंकडून भर
विद्यमान आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. मतदारांच्या सातत्याने थेट संपर्कात राहून त्यांनी अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वर्षे प्र​लंबित असणारे विषय त्यांनी राज्य सरकारमार्फत सोडविले असून त्याचा फायदा त्यांना निवडणुकीवेळी होऊ शकतो. सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्वच घटकांना लाभ मिळवून दिला आहे. सामाजिक संस्था, संघटना, धार्मिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग, क्रीडा, महिला, युवा मंडळ अशा अनेक घटकांशी असलेला नियमित संपर्क यामुळे फळदेसाईंचा मतदारांशी असलेला थेट संवाद त्यांची उजवी बाजू आहे.