Home >> ताज्या बातम्या >> २४ तासांत ४१ झाडे, एके ठिकाणी दरड कोसळली

२४ तासांत ४१ झाडे, एके ठिकाणी दरड कोसळली

२.१० लाखांचे नुकसान : ‌अग्निशमन दलाने वाचवली ३.९० लाखांची मालमत्ता


01st July, 11:49 pm
२४ तासांत ४१ झाडे, एके ठिकाणी दरड कोसळली

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गेल्या २४ तासांत राज्यभर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे ४१ झाडे कोसळण्याच्या, तसेच एके ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनांमध्ये अग्निशमन दलाने सुमारे ३.९० लाख रुपयांची मालमत्ता वाचवली, तर २.१० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
या सर्व घटना ३० जून रोजी सकाळी ७ ते १ जुलै रोजी सकाळी ७ या २४ तासांच्या कालावधीत नोंदविण्यात आल्या. वास्को येथे दरड कोसळल्याची घटना घडली असून त्यात घराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. झाडे कोसळण्याच्या सर्वाधिक सहा घटना डिचोली विभागात नोंदल्या गेल्या. पेडणे आणि फोंडा येथे प्रत्येकी पाच, काणकोण आणि पणजी येथे प्रत्येकी चार, म्हापसा, मडगाव आणि कुंकळ्ळी येथे प्रत्येकी तीन, तर वाळपई आणि वेर्णा येथे प्रत्येकी दोन घटना घडल्या. पिळर्ण, पर्ये, कुंडई आणि कुडचडे येथे प्रत्येकी एक घटना नोंदविण्यात आली.
राज्यभरात घडलेल्या घटना
करंझाळे येथे नारळाचे झाड घरावर पडल्याने नुकसान झाले. अग्निशमन दलाने सुमारे २५ हजार रुपयांची मालमत्ता वाचवली.
किटला-हळदोणे येथे जंगली झाड कार आणि दुचाकीवर कोसळल्याने दोन्ही वाहनांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर २ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.
गावडोंगरी येथे काजूचे झाड गोठ्यावर पडल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर २० हजार रुपयांची मालमत्ता वाचवली.
पैंगीण येथे झाड घरावर कोसळल्याने ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आणि १० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात आली.
बेतकी येथे वीजवाहिन्यांवर झाड कोसळल्याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात आली.
नागवे येथे आंब्याचे झाड दुचाकी व स्कुटीवर पडल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर ८० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात आली.
बेती येथील दत्त मंदिराजवळ झाड कोसळल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

फक्त काणकोणातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस
मान्सून सक्रिय झाल्यापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. २४ तासांत सरासरी २.५५ इंच पावसाची नोंद झाली. या कालावधीत सांगे येथे ४ इंच पाऊस झाला. मुरगाववगळता सर्व भागांत ३ इंचांहून अधिक पाऊस पडला. आतापर्यंत राज्यात सरासरी २६ इंच पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा ३० टक्के कमी आहे. काणकोण तालुक्यात सर्वाधिक ४४ इंच पावसाची नोंद झाली असून, तेथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने ७ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. दरवर्षी वाळपई आणि साखळी परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदा या भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. काणकोण आणि मडगाव परिसरात पावसाचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत पणजी येथे सर्वांत कमी १९.८० इंच पावसाची नोंद झाली आहे.