कॅमेऱ्यांद्वारे दंडापूर्वी व्यापक जनजागृती मोहीम

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : वाहतुकीवर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आता १५ जुलैपासून सुरू होणार आहे. एआय कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीवर नजर ठेवण्याबरोबरच नियमभंग करणाऱ्यांना दंड देण्यापूर्वी जनजागृती करणे आवश्यक असल्याने ही कारवाई पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माॅविन गुदिन्हो यांनी दिली.
राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने काही ठिकाणी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार होती.
वाहतूक खात्याची ६ जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत एआय कॅमेरे तसेच ‘रेन्ट-अ-कार’ व्यवसायासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांत नव्या रेन्ट-अ-कार वाहनांना परवाने दिलेले नाहीत. बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रेन्ट-अ-कार वाहनांना परवाने द्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय ६ जुलैच्या बैठकीत घेतला जाईल, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. रेन्ट-अ-कार वाहनांचा वापर पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. या वाहनांमुळे अनेक अपघात झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने नव्या रेन्ट-अ-कार वाहनांना परवाने देणे बंद केले होते. त्यामुळे बेकायदा व्यवसाय वाढल्याचे दिसून येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.
सध्या सर्व व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत. त्यामुळे टॅक्सीचालकांनाही डिजिटल प्लॅटफॉर्मचा स्वीकार करावा लागेल.
_ मॉविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री