पावसाची रिपरिप कायम : सखल भागात पाणी साचले, झाडे कोसळली

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : विर्डी-दोडामार्ग येथील वझरा सकला धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेले साखळीतील सहा युवक रविवारी अचानक वाढलेल्या पाण्यामुळे जंगलात अडकून पडले. अग्निशामक दल आणि स्थानिकांनी सर्वांची सुखरूप सुटका केली.
विर्डी दोडामार्ग (महाराष्ट्र) येथे वझरा-सकला धबधब्यावर जंगलमार्गे मौजमजा करण्यासाठी साखळी येथून गेलेले सहा युवक जंगलात अडकले. जोरदार पावसाने नदीची पातळी वाढल्यामुळे रविवारी रात्री ते जंगलात अडकून पडले. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी महाराष्ट्र वन विभागाशी संपर्क साधला. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांना जंगलातून बाहेर काढून साखळी येथे सुखरूप पाठविण्यात आले.
या सहा युवकांमध्ये साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांचाही पुत्र होता. सिद्धी यांचे पती संदेश प्रभू यांनी दुचाकी गाड्या शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शोधमोहिमेत साखळीतील युवक, अडकलेल्या युवकांचे पालक सहभागी झाले. मोबाईल नेटवर्क नसल्याने अडकलेल्या युवकांचा थांगपत्ता लागत नव्हता. शेवटचे टॉवर लोकेशन मिळवून शोधमोहीम हाती घेतली. विर्डी येथे या युवकांच्या दुचाकी मिळाल्या. जंगलात एके ठिकाणी हे सहाही युवक सापडले. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप गोव्यात आणले. हे बचावकार्य विभागीय अधिकारी श्रीपाद गावस यांच्या नेतृत्वाखाली आणि स्टेशन अग्निशमन अधिकारी संतोष गावस यांच्या सहकार्याने पार पडले.
सत्तरीतील बाराजण धबधब्यावर रविवारी बुडालेल्या आदित्य दीपक कुमार सत्पती (२०) याचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. वाळपई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांसह बेळगाव नौदलाच्या जवानांनी शोधकार्यात भाग घेतला
तपूर्वी, १८ जून रोजी विर्डी येथील वझरा सकला धबधब्यात बुडून मृत्यू झालेल्या कर्नाटक-धारवाड येथील २३ वर्षीय विजय दोडमणी याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना तीन दिवस अथक परिश्रम करावे लागले होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वन खाते आणि स्थानिक प्रशासनाने घातलेले निर्बंध पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच असतात. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालून किंवा चोरट्या मार्गाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी यांना परिसराची भौगोलिक स्थिती चांगल्या प्रकारे माहिती असते. त्यामुळे त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे पर्यटकांची जबाबदारी आहे. पावसाळ्यात पाणवठ्याच्या ठिकाणी जाताना अतिउत्साह टाळावा, खोल पाण्यात उतरणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या खबरदारीच्या इशाऱ्यांचे पालन करावे, जेणेकरून पर्यटनाचा आनंद कायम राहील.
२४ तासांत २७ झाडे कोसळली
रविवारी २४ तासांत राज्यात २७ झाडे कोसळण्याच्या, तर एक दरड कोसळण्याच्या घटनेची नोंद झाली. अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून सुमारे १ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता वाचवली, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. एकूण २८ घटनांपैकी सर्वाधिक चार घटना दिवाडी परिसरात घडल्या. पेडणे, फोंडा आणि काणकोण येथे प्रत्येकी तीन घटना नोंदविण्यात आल्या. म्हापसा, वास्को, जुने गोवे आणि कुडतरी येथे प्रत्येकी दोन घटना, तर पणजी, कुंडई आणि वेर्णा येथे प्रत्येकी एक घटना घडली. याशिवाय वास्को परिसरात दरड कोसळण्याची एक घटना घडली. या सर्व घटनांपैकी दोन घटनांमध्ये झाडे घरांवर कोसळल्याने सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे सुमारे १.१० लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.
काणकोण, केपे, फोंडा येथे साडेतीन इंचांहून अधिक पाऊस
गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू असला तरी पावसाची तूट अद्याप कायम आहे. ही तूट कमी होऊन आता ४१ टक्क्यांवर आली आहे. २४ तासांत राज्यात सरासरी २ इंच पावसाची नोंद झाली. काणकोण, केपे आणि फोंडा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असून २४ तासांत साडेतीन इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १६.८ मिमी पावसाची नोंद झाली.
यंदा मान्सून लवकर दाखल झाला असला तरी पावसाची सुरुवात उशिराने झाली. २१ जूनपर्यंत पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे पावसाची तूट सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र २२ जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढू लागला असून पाण्याच्या टंचाईबाबतची चिंता आता दूर झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने ५ जुलैपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सततच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या कोसळण्याबरोबरच अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. वीजपुरवठ्यातील व्यत्ययही सुरूच होता. मात्र पावसाच्या सरी अधूनमधून थांबत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले नाही. दरवर्षी वाळपई आणि साखळी परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र यंदा काणकोण आणि धारबांदोडा येथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.