सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या ओटवणे, चंदगड आणि पेडणे येथील श्री रवळनाथ मंदिरांच्या अद्भूत त्रिकोणाचे रहस्य काय आहे? वाचा विज्ञान, श्रद्धा आणि लोकपरंपरांची महती सांगणारा हा विशेष लेख .

दोन राज्ये, तीन जिल्हे आणि सुमारे १५० किलोमीटरचे भौगोलिक अंतर. सह्याद्रीच्या दुर्गम रांगा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कोकण, कोल्हापूर आणि गोव्याच्या सीमांवर एक असे गूढ दडलेले आहे, जे विज्ञानाच्या आधुनिक मर्यादांना थेट आव्हान देत आहे. हे रहस्य आहे दक्षिण कोकणचे आदिदैवत 'श्री रवळनाथांच्या' तीन प्राचीन मंदिरांचे, ज्यांनी गुगल मॅप किंवा नकाशावर एक अद्भूत आणि अचूक समांतर त्रिकोण निर्माण केला आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे ओटवणे, कोल्हापूरचा चंदगड आणि गोव्यातील पेडणे ही तीन ठिकाणे केवळ राजकीय किंवा भौगोलिक सीमांवर विभागलेली नाहीत, तर ती एका प्राचीन आध्यात्मिक आणि भू-चुंबकीय ऊर्जेची केंद्रस्थाने मानली जातात. या मंदिरांची रचना, त्यामागील लोककथा आणि आजही जिवंत असलेल्या प्रथा आधुनिक जगातही विचार करायला भाग पाडतात.
या तीन मंदिरांचे सर्वात मोठे दृश्य रहस्य म्हणजे येथील गर्भगृहात विराजमान असलेल्या श्री रवळनाथांच्या मूर्तींमध्ये आढळणारे कमालीचे साम्य होय. शतकानुशतके उलटूनही, या तिन्ही ठिकाणच्या मूर्तींची शारीरिक ठेवण, त्यांचे शिल्प, हातातील शस्त्रे आणि मुखावरील तेजाळ रूप इतके हुबेहूब आहे की, जणू काही त्या एकाच शिल्पकाराने, एकाच विशिष्ट रात्रीत अत्यंत गूढ पद्धतीने घडवल्या असाव्यात. हे केवळ त्या काळातील विज्ञानाची समज, मानवी शिल्पकलेचे सर्वोच्च उदाहरण आहे की यामागे एखादी दैवी किमया दडली आहे, हा प्रश्न आजही इतिहासकार आणि पुरातत्व अभ्यासकांना थक्क करतो.
स्थान : चंदगड-कोल्हापूर.
परंतु, या मूर्तींच्या साम्यापेक्षाही अधिक थरारक आणि विस्मयकारक गोष्ट म्हणजे येथील 'रवळनाथांचे चक्र' होय. स्थानिक लोककथा आणि जाणकारांच्या मते, या तीन देवस्थानांमधील ऊर्जा एका विशिष्ट नैसर्गिक क्रमाने कार्यरत असते. अशी प्रगाढ श्रद्धा आहे की, एका वेळी केवळ दोन रवळनाथ भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि न्यायदानाचे कौलप्रसाद देण्यासाठी जागृत असतात, तर तिसरा देव त्या काळात 'विश्रांती' घेतो. हे चक्र अनादी काळापासून विनाखंड सुरू आहे. समजा ओटवणेचा रवळनाथ आणि पेडणेचा रवळनाथ यांच्याकडे भक्तांचे गाऱ्हाणे आणि कौलप्रसाद सुरू असतील, तर त्याच वेळी चंदगडच्या रवळनाथाला कौल लागत नाही, तिथे देव शांत असतो. जर चंदगड आणि ओटवणेचा देव न्यायनिवाडा करत असेल, तर पेडणेचा देव विश्रांती घेतो. भौगोलिकदृष्ट्या एवढ्या मोठ्या अंतरावर असलेली मंदिरे आणि त्यांचे हे आलटून-पालटून चालणारे चक्र मानवी आकलनापलीकडचे आहे.
स्थळ : ओटवणे-सावंतवाडी.
आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत पाहायचे झाल्यास, आपल्या पूर्वजांनी ज्या अचूक ठिकाणी ही मंदिरे उभारली, तिथे कदाचित पृथ्वीच्या चुंबकीय रेषांचे (Magnetic Lines) विशेष केंद्र असावे, ज्याचा अभ्यास आपल्या पूर्वजांना होता. हा केवळ योगायोग नसून आपल्या पूर्वजांना अवगत असलेली उच्च कोटीची भू-मिती आणि विज्ञानाची किमया असावी. या त्रिकोणी क्षेत्राच्या मध्यवर्ती भागात निर्माण होणारी ऊर्जा आजही या परिसराचे रक्षण करत असल्याची भक्तांची धारणा आहे.
स्थळ : पेडणे.
श्री देव रवळनाथ ही दक्षिण कोकणची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि जागृत देवता म्हणून ख्याती मिळवून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या देवालयांची संख्या सर्वाधिक आहे. सिंधुदुर्गात रवळनाथ देवालयांची संख्या ३१० हून अधिक आहे, तर एकट्या सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले परिसरात तब्बल २११ मंदिरे आहेत. जसे जसे आपण उत्तरेकडे जातो, तसतशी या मंदिरांची संख्या कमी होत जाते. गोव्यातही रवळनाथाचा प्रचंड प्रभाव असून तिथे ५० हून अधिक मंदिरे आहेत. गोव्यात आणि कोकणात भक्तांचे देवाशी इतके जवळचे आणि कौटुंबिक नाते आहे की, भक्त देवाला वेगवेगळ्या टोपणनावांनी हाक मारतात. आसगावच्या रवळनाथास 'थोटा रवळनाथ' किंवा 'गारुडी रवळनाथ' म्हणतात, तर माशेल येथील रवळनाथास 'पिसो रवळू' (वेडा रवळू) असे म्हटले जाते. वेंगुर्ल्याच्या रवळनाथाला 'बंदरी रवळनाथ' म्हणतात, कारण त्याची सत्ता सातासमुद्रावर चालते अशी मच्छीमारांची श्रद्धा आहे. म्हणूनच मच्छीमारीसाठी किंवा सागरी प्रवासासाठी निघण्यापूर्वी बांधव बंदरी रवळनाथासमोर नतमस्तक होतात.
या सर्व लोककथांमध्ये सिंधुदुर्गातील खानोली आणि तेंडोली या दोन गावांमधील देवांच्या भांडणाची कथा तर अंगावर काटा आणणारी आहे. वेंगुर्ले तालुक्यातील खानोली आणि कुडाळमधील तेंडोली ही गावे एका डोंगराच्या अंतरावर आहेत. तेंडोलीचे रवळनाथ पंचायतन तर तटबंदीने वेढलेले अत्यंत भक्कम स्थान आहे, जिथे ५२ ठिकाणी आपट्याची पाने लावून कौल घेतले जातात. शेकडो वर्षांपूर्वी तेंडोलीच्या सीमेवर आलेल्या एका देवीवरून दोन्ही गावांच्या रवळनाथ देवांमध्ये प्रचंड भांडण झाले. ही देवी मागे परतेना, हेच संघर्षाचे मूळ कारण होते. या रागातून खानोलीच्या रवळनाथाने तेंडोली मंदिराच्या भक्कम तटबंदीवर जोरदार लाथ मारली, ज्यामुळे ती तटबंदी कोसळली. याला 'जकात तट' असे म्हणतात. या लढाईत खानोलीच्या रवळनाथाच्या पायाला दुखापत झाली आणि तेव्हापासून खानोलीचा भक्त आपल्या लाडक्या देवाला 'मोडका देव' म्हणून हाक मारतो. भक्त जेव्हा अंतःकरणातून 'मोडक्या' रे माझ्यावर आलेले अरिष्ट तूच निवारण कर' अशी हाक मारतात, तेव्हा देव त्वरित पावतो, असा विश्वास आहे.
देवाने लाथ मारलेली तेंडोली येथील तटबंदी दुरुस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र काही केल्या ती मजबूत होत नव्हती. शेवटी काही वर्षांपूर्वी रवळनाथाला कौलप्रसाद लावत क्षमायाचना करून संपूर्ण तटबंदी नव्याने बांधण्यात आली. आता तटबंदी उभी असली, तरी प्रतिवर्षी चुकी-समजीचे गाऱ्हाणे आणि परंपरागत विधी केले जातातच. या देवांच्या भांडणाचे पडसाद आजही दोन्ही गावांच्या सामाजिक जीवनावर उमटताना दिसतात. खानोली आणि तेंडोली या गावातील मंडळींमध्ये आजही परस्परांमध्ये लग्न किंवा सोयरीक केली जात नाही. दोन्ही गावांतील लोक एकमेकांच्या गावात जाणे टाळतात आणि काही कारणास्तव जावे लागलेच, तर सूर्यास्तापूर्वी आपल्या गावाची सीमा ओलांडून परततात. काही वर्षांपूर्वी ज्यांनी हा नियम मोडून सोयरीक जुळवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे संसार अपयशी ठरल्याचे गावकरी सांगतात.
ग्रामदेवतेचा विषय येतो तेव्हा तो गावकऱ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. खानोलीच्या मंदिरात आजही ११ व्या शतकातील लाकडी दरवाजा पाहायला मिळतो, जो इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत ५३, वेंगुर्लेत २६, तर कुडाळमध्ये ३१ मंदिरे आहेत; त्या तुलनेत मालवण, देवगड आणि कणकवलीमध्ये रवळनाथ देवालयांची संख्या कमी आहे. श्रद्धा आणि विज्ञानाचा हा अद्भूत चमत्कार सह्याद्रीच्या हृदयात आजही एका अनोख्या वारशाच्या रूपाने जिवंत आहे, ज्याचा अनुभव तिथे गेल्यावर प्रत्येकाला येतोच.