"अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा" गुन्हा : न्यायालय

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे (६५ वर्षे) याला विशेष न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. (Nasrapur Case Verdict) सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा गुन्हा "अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा" (Rarest of Rare) असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
ही हृदयद्रावक घटना १ मे रोजी घडली होती. उन्हाळी सुट्टीसाठी नसरापूर येथील आजीच्या घरी आलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीला आरोपीने खाऊ आणि नुकतेच जन्मलेल्या वासराला दाखवण्याचे आमिष दाखवत गोठ्याजवळील शेडमध्ये नेले. तेथे आरोपीने तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची हत्या केली.
या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांच्या तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि गुन्ह्याचे क्रौर्य लक्षात घेऊन आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.