Home >> देश -परदेश >> मुंबईत मोहरम मिरवणुकीत ३० हजार भाविकांना विष देण्याचा कट

मुंबईत मोहरम मिरवणुकीत ३० हजार भाविकांना विष देण्याचा कट

१५ हजार कॅप्सूलसह पुण्याचा तरुण जेरबंद

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
28th June, 11:19 am
मुंबईत मोहरम मिरवणुकीत ३० हजार भाविकांना विष देण्याचा कट

मुंबई : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा आणि भयंकर विषप्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने उधळून लावला आहे. भायखळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुमारे ३० हजार भाविकांना 'पेन किलर' (वेदान्तक) सांगून उंदीर मारण्याचे विष देण्याचा हा थरारक डाव होता. याप्रकरणी पोलिसांनी फैयाज निसार हुसेन प्रेमजी (रा. विमाननगर, पुणे) या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल जप्त केल्या आहेत.


भायखळा येथील मिरवणुकीत हजारोंची गर्दी असताना फैयाज हा संशयित तरुण लोकांना कॅप्सूल वाटत होता. मिरवणुकीत मातम करताना स्वतःला जखमा करून घेणाऱ्या भाविकांना वेदना कमी व्हाव्यात, म्हणून या 'हर्बल पेन किलर' असल्याचा दावा तो करत होता. यादरम्यान, सलमान सय्यद नावाच्या एका व्यक्तीने ही कॅप्सूल खाल्ली आणि त्याला तातडीने उलट्या सुरू झाल्या. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फैयाजला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील कॅप्सूलची तपासणी केली असता, त्यात अत्यंत विषारी 'झिंक फॉस्फाईड' असल्याचे निष्पन्न झाले.


गोळ्या विषारी असल्याचे समजताच पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता गर्दीमध्ये लाऊडस्पीकरवरून घोषणाबाजी सुरू केली. कोणीही अनोळखी व्यक्तीकडून औषधे घेऊ नका आणि घेतलेल्या गोळ्या खाऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले. यामुळे शेकडो भाविकांनी गोळ्या खाणे टाळले आणि पोलिसांच्या या तत्परतेमुळे हजारो निष्पाप भाविकांचे प्राण वाचले.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित फैयाजने ऑनलाइन माध्यमातून तब्बल ५० किलो झिंक फॉस्फाईड पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूल मागवल्या होत्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये साधारण १ ग्रॅम विष भरून ते वाटण्याचा त्याचा कट होता. पोलिसांनी त्याच्याकडून ओळखपत्रे आणि पासपोर्ट जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा