अपहरणाचा प्रयत्न फसला. कर्नाटकातील घटना

कर्नाटक : कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-४८जवळ एका धावत्या कारमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. आपल्या माजी प्रियसीचे अपहरण करून तिला सोबत घेऊन आत्महत्येच्या उद्देशाने एका तरुणाने कारमध्ये स्फोट घडवून आणला. या स्फोटात नागेंद्र (वय ३०, रा. अंकोला) या तरुणाचा कारमध्येच होरपळून जागीच मृत्यू झाला. सुदैवाने, कारमधील तरुणी आणि कॅब चालक वेळीच वाहनातून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नागेंद्र आणि पीडित तरुणी रम्या हे गेल्या ६ वर्षांपासून नात्यात होते. रम्या बंगळुरूमधील संजय गांधी रुग्णालयात असिस्टंट ऑपरेशन थिएटर टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याने रम्याने नागेंद्रशी संबंध तोडले होते आणि त्याचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. याच रागातून नागेंद्रने शनिवारी सकाळी बंगळुरूमधील जयनगर येथील तिच्या खोलीवर जाऊन तिला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने एका उबर कॅबमध्ये बसवून तिचे अपहरण केले.
रम्याचा पत्ता लागत नसल्याने तिच्या मैत्रिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत सीसीटीव्हीच्या मदतीने कॅब शोधून काढली आणि चालक प्रवीणशी संपर्क साधला. पोलिसांनी चालकाला गाडी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश दिले. मात्र, नागेंद्रने पोलिसांचे बोलणे ऐकले आणि तो प्रचंड संतापला.
आपण दोघे आता एकत्रच मरणार, असे ओरडत नागेंद्रने खिशातील गावठी बॉम्ब काढला आणि रम्यावर चाकूने हल्ला केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून चालक प्रवीणने तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. गाडी थांबताच जखमी रम्या आणि चालक प्रवीण यांनी कारचे दरवाजे उघडून बाहेर उड्या मारल्या.

दोघे बाहेर पडताच अवघ्या काही सेकंदांत कारमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला आणि कारने पेट घेतला. नागेंद्र कारच्या आतच अडकल्याने तो जिवंत जळाला. हा स्फोट इतका भीषण होता की राष्ट्रीय महामार्गावर सुमारे १ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नागेंद्रकडे ही स्फोटके कुठून आली, त्याचा मुख्य हेतू काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. जखमी रम्या आणि चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.