Home >> देश -परदेश >> अरुणाचलला ढगफुटीचा कहर; आसामलाही फटका : तिघांचा मृत्यू

अरुणाचलला ढगफुटीचा कहर; आसामलाही फटका : तिघांचा मृत्यू

घरे-पूल वाहून गेले; आसाममधील रेल्वे सेवाही विस्कळीत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
अरुणाचलला ढगफुटीचा कहर; आसामलाही फटका : तिघांचा मृत्यू

ईटानगर : अरुणाचल प्रदेशात अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा झालेल्या ढगफुटीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Flash floods devastate Arunachal Pradesh) या आपत्तीत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः कीई पन्योर जिल्ह्यातील अनेक गावे पूर आणि भूस्खलनाच्या तडाख्यात सापडली असून घरे, रस्ते, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचाव आणि पुनर्बांधणीच्या कामांनाही अडथळे निर्माण होत आहेत.

मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले, तर अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रविवारी आणखी एका मृतदेहाचा शोध लागल्यानंतर मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. प्रशासनाने प्रभावित भागांमध्ये मदतकार्य आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे.

पूराच्या तडाख्यात अनेक घरे वाहून गेली असून महत्त्वाचे पूल आणि रस्तेही कोसळले आहेत. केमी आणि ओयान परिसराला जोडणारा सुमारे ३०० मीटर लांबीचा लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेकडो वाहने अडकली; रेल्वे सेवा तात्पुरती बंद

दरम्यान, भूस्खलनामुळे पोटीन-पोसा मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१५ वर पाणी साचल्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली आहेत. तसेच आसाममधील आर्चीपाथर आणि सिमेन चापरी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या पुलाला पूर आणि नदीकाठाच्या धूपामुळे नुकसान झाल्याने रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. (train services suspended in Assam)

आसामला फटका 

अरुणाचलमधील मुसळधार पावसाचा परिणाम शेजारच्या आसाम राज्यावरही झाला आहे. लेकू नदीला आलेल्या पुरामुळे जोनाई उपविभागातील शंभरहून अधिक कुटुंबे बाधित झाली असून शेती, जनावरे आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.

अनेकांनी कपड्यांनिशी वाचवला जीव 

पूरग्रस्त नागरिकांनी या आपत्तीचे भयावह चित्र मांडले आहे. काही मिनिटांतच घरात पाणी शिरून संपूर्ण संसार वाहून गेल्याचे अनेकांनी सांगितले. अनेक कुटुंबांनी केवळ अंगावरील कपड्यांनिशी जीव वाचविल्याचे हृदयद्रावक वास्तव समोर आले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अरुणाचल प्रदेशातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संभाव्य भूस्खलन आणि पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा