Home >> देश -परदेश >> ऑनलाईन फसवणुकीत पैसे गेले? आरबीआयच्या नव्या नियमांमुळे मिळू शकते २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई

ऑनलाईन फसवणुकीत पैसे गेले? आरबीआयच्या नव्या नियमांमुळे मिळू शकते २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई

डिजिटल व्यवहारांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी निर्णय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26th June, 02:06 pm
ऑनलाईन फसवणुकीत पैसे गेले? आरबीआयच्या नव्या नियमांमुळे मिळू शकते २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई

 नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना ऑनलाईन फसवणुकीच्या (Digital online fraud) घटनांमध्येही मोठी वाढ होत आहे. बनावट केवायसी अपडेट, फिशिंग लिंक, बनावट अ‍ॅप्स किंवा अन्य सायबर फसवणुकीमुळे अनेक नागरिक आपले पैसे गमावून बसत आहेत. अशा पीडित ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India (RBI) (आरबीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन फसवणूक झालेल्यांना २५ हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचा प्रस्तावित नियम जाहीर केला आहे.

आरबीआयच्या नव्या डिजिटल फसवणूक भरपाई चौकटीची अंमलबजावणी १ जानेवारी २०२७ पासून होणार आहे. या नियमानुसार, ग्राहकांनी अनधिकृत डिजिटल व्यवहाराची माहिती लक्षात आल्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित बँकेला तक्रार केल्यास त्यांना २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळण्याची संधी उपलब्ध होईल. मात्र, ही भरपाई तपासाच्या निष्कर्षांवर आणि लागू अटींवर अवलंबून असेल.

डिजिटल व्यवहारांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी निर्णय

आरबीआयचा हा निर्णय डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत.

दरम्यान, ग्राहकांच्या संरक्षणाबरोबरच बँकांनी त्यांच्या अंतर्गत जोखीम व्यवस्थापन प्रणाली अधिक मजबूत कराव्यात, यावरही आरबीआयने भर दिला आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग आणि स्वयंचलित निर्णय प्रणालींच्या वापराबाबतही नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

फसवणुकीवर नजर ठेवण्यासाठी एआय प्रणालींचा वापर 

सायबर फसवणूक ओळखण्यासाठी आणि संशयास्पद व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी बँका आता अधिक प्रगत एआय प्रणालींचा वापर करत आहेत. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार लवकर ओळखणे आणि चोरी गेलेले पैसे शोधणे अधिक सोपे होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्राहकांनी संशयास्पद व्यवहाराची माहिती द्यावी

तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी कोणतीही संशयास्पद किंवा अनधिकृत व्यवहाराची माहिती तातडीने बँकेला दिल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरल्यानंतर वेळ न दवडता त्वरित तक्रार नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा
सर्व पहा