Home >> देश -परदेश >> नीटनंतर टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फुटली; महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

नीटनंतर टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फुटली; महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27th June, 02:01 pm
नीटनंतर टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फुटली; महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाची मानली जाणारी महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ ही (Maharashtra, the Teachers Eligibility Test (TET)) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर पुढे ढकलण्यात आली आहे.   राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर रविवारी, २८ जून रोजी ही परीक्षा होणार होती. नीट परिक्षेनंतर पेपर फुटून परीक्षा पुढे ढकलण्याची आणखी एक घटना घडली आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शनिवारी याबाबत अधिकृत घोषणा करत परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. नव्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शनिवारी पहाटे भिवंडी पोलिसांनी छापा टाकून काही व्यक्तींकडून टीईटी २०२६च्या सीलबंद प्रश्नपत्रिकेतील काही पाने जप्त केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका परीक्षेच्या जवळपास २४ तास आधीच ठाणे परिसरात फुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्रश्नपत्रिका जप्त केली असून या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

या घटनेमुळे राज्यभरातील लाखो परीक्षार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटीमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा