Home >> देश -परदेश >> निवृत्तीच्या चार दिवस आधीच आयएएस अधिकारी फरार; ६६१ कोटींच्या घोटाळ्यामुळे हरियाणात खळबळ

निवृत्तीच्या चार दिवस आधीच आयएएस अधिकारी फरार; ६६१ कोटींच्या घोटाळ्यामुळे हरियाणात खळबळ

आता पर्यंत दोन आयएएस अधिकारी, एका आयएफएस अधिकाऱ्याला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
निवृत्तीच्या चार दिवस आधीच आयएएस अधिकारी फरार; ६६१ कोटींच्या घोटाळ्यामुळे हरियाणात खळबळ

चंदीगड : हरियाणातील तब्बल ६६१ कोटी रुपयांच्या बहुचर्चित बँक घोटाळ्याच्या (Haryana 661 crore rupees Bank scam)  तपासाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आयएएस अधिकारी प्रदीप डागर हे निवृत्तीच्या अवघ्या चार दिवस आधी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मोबाईल फोनही बंद असल्याने केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) त्यांचा शोध तीव्र केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप डागर हे ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते. याच काळात चंदीगड येथील एका खासगी बँकेच्या शाखेमधील मंडळाच्या खात्यातून तब्बल १६९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला.

या संपूर्ण घोटाळ्यात एका विभागाशी संबंधित ही सर्वात मोठी आर्थिक अफरातफर मानली जात आहे. प्रकरणाचा तपास करताना मोठी रक्कम व व्याप्तीही मोठी असल्यचे उघडकीस आले. सुमारे ६६१ कोटी रुपयांचा याप्रकरणात अपहार झाल्याचे दिसून आले. 

सीबीआयच्या माहितीनुसार, काही बँक अधिकाऱ्यांशी संबंधित शेल कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम बाहेर काढण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशीसाठी आवश्यक मंजुरीही मिळाल्याचे समजते. या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही तपास सुरू आहे.

प्रदीप डागर यांना यावर्षी ८ एप्रिल रोजी परिवहन विभागातील संचालक आणि विशेष सचिव पदावरून निलंबित करण्यात आले होते. मात्र, निवृत्तीपूर्वीच बेपत्ता झाल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

दोन आयएएस, एका आयएफएस अधिकाऱ्याला अटक 

दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत दोन आयएएस अधिकारी आणि एका आयएफएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.  पंकज अग्रवाल, आर.के. ‌‌सिंह व नवनीत श्रीवास्तव (आयएफएस) या तिघांचा समावेश आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तपासादरम्यान काही महत्त्वाचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश आणि डिजिटल पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेच्या हालचालींचा उल्लेख असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्व डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता

दरम्यान, उपलब्ध मालमत्ता विवरणानुसार प्रदीप डागर याच्या नावावर रोहतक आणि गुरुग्राम येथे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. गुरुग्राममधील आलिशान निवासी प्रकल्पातील कोट्यवधींचा फ्लॅटही त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या संयुक्त मालकीचा असल्याची नोंद आहे.

असा झाला पर्दाफाश 

फेब्रुवारी महिन्यात एका सरकारी विभागाच्या खात्यांतील रकमेची पडताळणी करताना सरकारी नोंदी आणि बँक खात्यांमधील रकमेमध्ये मोठी तफावत आढळून आली होती. त्यानंतर या बहुचर्चित ६६१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.

सुरूवातीला राज्यस्तरीय यंत्रणांकडून तपास करण्यात आला; मात्र घोटाळ्याचे वाढते स्वरूप आणि अनेक विभागांशी असलेले संबंध लक्षात घेता प्रकरण केंद्रीय तपास संस्थेकडे सोपविण्यात आले.

या प्रकरणात आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, हरियाणातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा
सर्व पहा