
कराकास : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दुहेरी भूकंपाच्या तडाख्यातून सावरत असतानाच व्हेनेझुएलाला पुन्हा एकदा भूकंपाचा (Venezuela earthquake) धक्का बसला आहे. देशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ शुक्रवारी रात्री रिश्टर स्केलवर ४.९ तीव्रतेचा भूकंप झाला. या नव्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी व्हेनेझुएलामध्ये ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे सलग दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या भूकंपांमुळे अनेक इमारती जमीन दोस्त झाल्या. मृतांचा आकडा ९२० वर पोहोचला आहे. हजारो नागरिक अद्याप बेपत्ता असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रवेशावर निर्बंध
सर्वाधिक फटका बसलेल्या ला ग्वायरा परिसरात बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. आता या भागात प्रवेश करण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक राहणार. अनावश्यक गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे बचाव मोहिमेत अडथळे येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मदतीचा ओघ सुरू
दरम्यान, व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी अनेक देशांनी हात पुढे केला असून विविध देशांतील बचाव पथके आणि मदत साहित्य मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मदतकार्याला वेग आला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरूच आहे.