Home >> गुन्हे >> त्याने माझ्यासोबत काहीच वावगे केले नाही..!

त्याने माझ्यासोबत काहीच वावगे केले नाही..!

अल्पवयीनेच्या जबाबामुळे अपहरण, लैंगिक अत्याचारप्रकरणी युवकाला जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
त्याने माझ्यासोबत काहीच वावगे केले नाही..!

पणजी : संशयिताने आपल्यासोबत काहीही वावगे वर्तन केलेले नाही, असा जबाब देत अल्पवयीन पीडितेने जामीन अर्जाला कोणताही आक्षेप घेतला नाही, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने संशयित युवकाला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.

आपल्या १६ वर्षीय मुलीचे ५ नोव्हेंबर २०२५ रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार वडिलांनी फोंडा पोलिसात दिली. याची दखल घेऊन फोंडा पोलिसांनी मुलीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलीची कर्नाटकातून सुटका केली. तर, तिच्याबरोबर असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित मुलीचा बिगर सरकारी संस्थेमार्फत जबाब नोंद केला. त्यावेळी संशयिताने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा जबाब दिला. त्यानुसार, लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. तसेच न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंद करण्यात आला. या प्रकरणी तपासपूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात संशयित युवकाविरोधात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फेटाळून लावला. हा अर्ज फेटाळल्यावर युवकाने पुन्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. यावेळी न्यायालयाने मुलीला बाजू मांडण्यास सांगितले. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे ती स्वतःहून त्याच्यासोबत गेली होती. तसेच संशयिताच्या जामीन अर्जाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून युवकाला २५ हजार रुपये, पीडित मुलीला तसेच साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे संपर्क साधून दबाव टाकू नये, तिचा पाठलाग करू नये, तिला कोणत्याही प्रकारे धमकावू नये, तिच्यावर दबाव आणू नये किंवा तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. याशिवाय पीडितेविरुद्ध सोशल मीडियाचा वापर करण्यास मज्जाव केला व इतर अटींवर संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. 

हेही वाचा
सर्व पहा