Home >> गुन्हे >> तांत्रिक मालिशच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणारा निर्दोष

तांत्रिक मालिशच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणारा निर्दोष

विदेशी महिला न्यायालयात गैरहजर राहिल्याचा फायदा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th June, 12:08 am
तांत्रिक मालिशच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणारा निर्दोष

पणजी : तांत्रिक मसाज देण्याच्या बहाण्याने २०१७ मध्ये कोरगाव येथील योगा सेंटरमध्ये विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी विदेशी महिला न्यायालयात हजर राहिल्या नसून त्यांची उलटतपासणी झाली नाही. दरम्यान, न्यायालयाने संशयित प्रतीक अग्रवाल याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश मेरशी येथील जलदगती न्यायालयाचे न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.

पेडणे पोलिसांनी ६ फेब्रुवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित अमेरिकन महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तिने संकेतस्थळावरून ३१ डिसेंबर २०१६ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत योगा कार्यशाळेसाठी प्रवेश घेतला होता. याच दरम्यान संशयित प्रतीक अग्रवाल याने २ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ४ ते ७ दरम्यान तांत्रिक मसाज देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. याची दखल घेऊन पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित अग्रवाल याला अटक केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मसाज केंद्रातील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंद केला असता, आणखीन एका विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. या घटनेनंतर पोलिसांनी सदर विदेशी महिलेची जबाब नोंद केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास पूर्ण करून न्यायालयात संशयित प्रतीक अग्रवाल याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने संशयिताला जामीन मंजूर केला.

दरम्यान संशयिताविरोधातील प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालायने १२ एप्रिल २०२२ रोजी संशयिताविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. न्यायालयात संशयितातर्फे अॅड. रोहन देसाई आणि अॅड. ए. प्रियोळकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता दोन्ही विदेशी महिला न्यायालयात उलटतपासणीसाठी हजर राहिल्या नाहीत. या प्रकरणी न्यायालयाने संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा
सर्व पहा