मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे : सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम

वाळपई : सुर्ला येथील बाराजण धबधब्यावर रविवारी सायंकाळी बेळगाव येथील २० वर्षीय युवक पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने युवकाचा शोध घेण्यात रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात आले; मात्र अंधार आणि वेगवान प्रवाहामुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा संयुक्त शोधमोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील सुर्ला गावाजवळ, म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात असलेल्या बाराजण धबधब्यावर रविवारी दुपारी बेळगाव येथील तरुण आंघोळ करण्यासाठी आले होते. धबधब्यावर जाण्यास मज्जाव असूनही वन कर्मचाऱ्यांना न जुमानता सुमारे दीडशे ते दोनशे कर्नाटकातील पर्यटक या धबधब्यावर गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेल्या आदित्य दीपक कुमार सत्पती (वय २०) या युवकाचा पाण्यात तोल जाऊन तो खोल डोहात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खोलीमुळे त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली
वाळपई शहरापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. त्यांच्यासोबत म्हादई अभयारण्याचे कर्मचारी, वाळपई पोलीस, स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवकांनी शोधकार्य सुरू केले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन बेळगाव येथून नौदलाच्या प्रशिक्षित जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनीही संध्याकाळपर्यंत शोधकार्य केले; मात्र अंधार पडल्याने आणि पाण्याचा वेग वाढल्यामुळे शोधकार्य पुढे सुरू ठेवणे धोकादायक ठरत असल्याने रात्री उशिरा मोहीम थांबविण्यात आली.
निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचा मुलगा
प्राथमिक माहितीनुसार, आदित्य कुमार सत्पती हा मूळ ओडिशा राज्यातील असून त्याचे कुटुंब सध्या बेळगाव येथे वास्तव्यास आहे. त्याचे वडील निवृत्त नौदल अधिकारी असल्याचे समजते. मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी तो सुर्ला येथील धबधब्यावर आला होता. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांसह बेळगावमधील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.