गुन्हा शाखेची कारवाई : सुमारे दीड कोटी किमतीचे पेट्रोलियम पदार्थ, टिप्पर, टँकर जप्त

वास्को : दाबोळी येथे एका हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक, हाताळणी करण्यात येत असल्यामुळे गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने शनिवारी छापा मारून सुमारे दीड कोटी किमतीचे पेट्रोलियम पदार्थ, टिप्पर, टँकर जप्त केले. सदर कारवाई सुमारे सहा तास चालली होती. कारवाई पोलीस अधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबोळी येथील एका हॉटेलसमोरच्या मोकळ्या जागेत पेट्रोलियम पदार्थांची अवैध साठवणूक व हाताळणी करण्यात येत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून शनिवार, २७ जून रोजी छापा मारण्यात आला. त्यावेळी तेथे सहा इंधनवाहू टँकर व एक टिपर ट्रक आढळून आले. त्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी इंधनवाहू टँकरामध्ये पेट्रोलियम द्रव पदार्थ साठविलेला आढळला. त्या टँकरातील सर्व पेट्रोलियम पदार्थांचे नमुने गोळा करण्यात आल्यावर सील करण्यात आले. जप्त केलेले नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. पथकाने १.५ कोटी रुपये किमतीचे पेट्रोलियम पदार्थ, टिप्पर, टँकर जप्त केले.
पोलीस महानिरीक्षक वेद प्रकाश सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे अधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक सूरज हळर्णकर, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, परेश नाईक, विकास दयेकर, हवालदार नवीन पालयेकर, कॉ. सुशांत पागी, यशवंत गावकर, रुपेश गायकवाड, महिला शिपाई सेजल दळवी व इतर पथकाने कारवाई केली.
सांकवाळमधील व्यक्तीकडून अवैध साठवणूक
सांकवाळ येथील देवेंद्र नाईक उर्फ राजू चव्हाण यांच्याकडून सदर पेट्रोलियम पदार्थांची अवैधरित्या साठवणूक, हाताळणी करण्यात येत असल्याचा संशय गुन्हा शाखेने व्यक्त केला आहे. या ठिकाणी साठवण्यात आलेले पेट्रोलियम पदार्थ अवैधरित्या काळ्या बाजारात वळविण्यात येत होते. या अवैध साठवणुकीमुळे आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. या प्रकरणी भा. न्या. संहितेच्या कलम २८७, पेट्रोलियम कायदा १९३४ च्या कलम २३, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५च्या कलम ३ आरडब्ल्यू ७ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ८ आरडब्ल्यू १५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.