१८ जून रोजी सुकूर पंचायतीजवळ पूर्ववैमनस्यातून झाला होता आनंद पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला

पणजी : पर्वरी जवळील सुकूर पंचायत बागेजवळ (Socorro Panchayat Garden) १८ जून रोजी पणजी : पर्वरी जवळील सुकूर पंचायत बागेजवळ (Socorro Panchayat Garden) १८ जून रोजी झालेल्या हिंसक आणि जीवघेण्या मारहाण प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आनंद पाटील यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या टोळीच्या हल्ल्यात पाटील यांच्या चेहऱ्याला, डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून २१ जून रोजीच तीन संशयितांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून आणि वैयक्तिक वैमनस्यातून करण्यात आला होता. १८ जून रोजी संशयित आरोपींच्या एका गटाने आनंद पाटील यांना गाठून त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. आनंद पाटील यांच्या निधनामुळे आता या गुन्ह्याचे गांभीर्य अधिक वाढले असून, पोलीस या प्रकरणात हत्येचे कलम जोडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रणय बोरकर, अर्जुन पार्सेकर, अनिश बोरकर (रा. सर्व चिंबल) यांना आधीच बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, मुख्य संशयित सौरभ नारुळकर हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता. तो गोव्यातून बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असण्याची शक्यता लक्षात घेऊन, विमानतळ आणि सीमाभागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान आज त्याला ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच अनर्थ? माजी सरपंचांचा संतप्त सवाल
आनंद पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सुकूर पंचायतीचे माजी सरपंच संदीप मांजरेकर यांनी थेट स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मांजरेकर यांनी आरोप केला आहे की, या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे गस्त (Patrolling) वाढवण्याची वारंवार मागणी केली होती. एवढेच नव्हे तर, या संदर्भात स्थानिक मंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही रीतसर दाद मागण्यात आली होती. पोलिसांनी जर वेळीच या इशाऱ्यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली असती, तर आज आनंद पाटील यांच्यावर ओढावलेला हा भीषण प्रसंग आणि मोठी दुर्घटना टाळता आली असती, असा स्पष्ट दावा मांजरेकर यांनी केला आहे.
आनंद पाटील यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांवर तात्काळ हत्येचा (Murder Case) गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी आग्रही मागणी मांजरेकर यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.