Home >> गुन्हे >> ग्राहक बनून आले अन् सोन्याच्या १६ अंगठ्या घेऊन पळाले; कांदोळीत ज्वेलरी शॉपमधील घटना

ग्राहक बनून आले अन् सोन्याच्या १६ अंगठ्या घेऊन पळाले; कांदोळीत ज्वेलरी शॉपमधील घटना

सिसिटीव्हीच्या आधारे ५ जणांना अटक; कळंगुट पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत लावला प्रकरणाचा छडा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
28th June, 04:15 pm
ग्राहक बनून आले अन् सोन्याच्या १६ अंगठ्या घेऊन पळाले; कांदोळीत ज्वेलरी शॉपमधील घटना

म्हापसा : गोव्यातील कांदोळी येथील 'उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉप' या प्रसिद्ध सराफी दुकानातून तब्बल २२ लाख रुपये किमतीच्या १६ सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या महाराष्ट्रातील एका आंतरराज्य टोळीचा कळंगुट पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत पर्दाफाश केला आहे. या टोळीने चांदीचे पैंजण खरेदी करण्याचा बनाव करत अत्यंत हुशारीने ही चोरी केली होती. मात्र, दुकानात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा तांत्रिक तपास यांमुळे या आंतरराज्य टोळीला रायगड (महाराष्ट्र) येथे बेड्या ठोकण्यात आल्या. या टोळीवर यापूर्वी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथेही चोरीचे गुन्हे नोंद असून त्यांना तिथेही अटक झाली होती.



अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये पांडुरंग गणपत पवार (वय ७६, रा. खर्नाळे, महाड-महाराष्ट्र), मंगेश भाऊ सुर्वे (वय ३५, रा. खर्नाळे, महाड), सतीश नामदेव शिंदे (वय ४१, रा. खर्नाळे, महाड), जोशना आनंद पवार (वय ६५, रा. खर्नाळे, महाड) आणि विमल राजेंद्र जाधव (वय ६१, रा. सातारा) यांचा समावेश आहे. ही धाडसी चोरीची घटना शुक्रवार, २६ जून रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली होती. याप्रकरणी दुकान मालक उदय शिरोडकर यांनी कळंगुट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दुकानात ग्राहक बनून आले होते. या टोळीतील तीन पुरुष संशयितांनी दुकानदार शिरोडकर यांना चांदीचे पैंजण दाखवण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवले. याच वेळेचा फायदा उठवत टोळीतील एका महिलेने शोकेसमधील सोन्याच्या अंगठ्यांचे रॅक बाहेर काढले आणि दुसऱ्या महिलेच्या पिशवीत अत्यंत शिताफीने सरकवले. ऐवज लंपास केल्यानंतर सर्व संशयित घाईघाईने दुकानातून निघून गेले. काही वेळाने रॅक गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा चोरीचा प्रकार समोर आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कळंगुट पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली गेली. ही टोळी गोव्यातून पळ काढून महाराष्ट्रात रायगडच्या दिशेने गेल्याचे समजताच कळंगुट पोलिसांनी रायगड पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सतर्क केले. लोर्णे-रायगड येथील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या या टोळीला तेथील स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कळंगुट पोलिसांचे पथक रविवारी, २८ जून रोजी संशयितांना गोव्यात घेऊन आले आणि त्यांना रितसर अटक करण्यात आली. पोलिसांने या टोळीकडून १६ पैकी १५ अंगठ्या जप्त केल्या असून, एका अंगठीचा शोध सुरू आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परश सिनारी, उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर, कॉन्स्टेबल विजय नाईक, राजेश कांदोळकर आणि योगेश बोर्डेकर यांच्या पथकाने बजावली.


हेही वाचा
सर्व पहा