दुचाकीचालक गंभीर; थारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना.

गोव्यात वाढत्या रस्ते अपघातांमुळे सर्वांच्याच चिंता वाढवल्या आहेत. रविवारी दुपारी वेर्णा येथील ब्ल्यूबेरी परिसराजवळ महिंद्रा थार, ह्युंदाई क्रेटा आणि ज्युपिटर स्कूटर यांच्यात एक अपघात घडला. यात एक दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. भरधाव वेग आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एक महिंद्रा थार कार वेर्णाच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. ब्ल्यूबेरी परिसराजवळ पोहोचताच चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती थेट एका ह्युंदाई क्रेटा कारला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, थार कार रस्ता दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या ज्युपिटर स्कूटरला थारने जोरदार धडक दिली.
ज्युपिटर स्कूटर थेट थार कारच्या खाली आली आणि या धडकेच्या प्रभावामुळे तिन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला गेली. या अपघातात स्कूटरचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून, अपघात नेमका कशामुळे झाला याचा सविस्तर तपास सुरू केला आहे.