शवचिकित्सेनंतरही पिता-पुत्राच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

म्हापसा : येथील इंदिरानगर, करासवाडा येथील भाड्याच्या खोलीत सोनुर्ली सावंतवाडी येथील जाधव कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रकार घडला होता. या घटनेतील बेशुद्धावस्थेत असलेल्या सुवर्णा जाधव हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, पिता-पुत्राच्या मृतदेहाची चिकित्सा करण्यात आली. शवचिकित्सा अहवालात डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केलेले नसून व्हिसेरा पुढील फॉरेन्सिक चाचणीसाठी राखून ठेवला आहे. कुटूंबातील तिघांचाही मृत्यू झाल्यामुळे या सामूहिक आत्महत्येमागचे गुढ गुलदस्त्यातच राहिले आहे.
रविवार, दि. २८ रोजी सकाळी या घटनेतील अजय व त्यांचा पुत्र अथर्व या दोघांच्या मृतदेहाची गोवा वैद्यकिय इस्पितळात चिकित्सा झाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले. तर, सायंकाळी सुवर्णा जाधव हिचे उपचारादरम्यान निधन झाले. शनिवारी बेशुद्धावस्थेत सापडलेल्या सुवर्णा हिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. मात्र, तिच्याकडून उपचाराला कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. रविवारी सायंकाळी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही घटना शनिवार, २७ रोजी दुपारी १२ वा. सुमारास उघडकीस आली होती. मूळचे सोनुर्ली-सावंतवाडी येथील हे जाधव कुटुंब मागील वर्षभरापासून इंदिरानगर करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. अजय जाधव यांचे वडील खोलीवर आल्यावर हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार निदर्शनास आला होता. अजय जाधव (३८) आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा अथर्व हे खोलीमध्ये मृतावस्थेत होते. तर सुवर्णा जाधव बेशुद्धावस्थेत होत्या. १०८ रूग्णवाहिकेतील परिचारिकेला त्यांची नाडी सुरू असल्याचे लक्षात येताच, सुवर्णा यांना त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना गोमेकॉत पाठवण्यात आले होते.
दरम्यान, अजय जाधव यांना किरकोळ मधुमेहाचा त्रास होता. तर, सुवर्णा व अथर्व यांना कोणतेही आजारपण नव्हते. अथर्व हा म्हापशातील एका शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत होता.
कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबाकडून हे टोकाचे पाऊल का उचलले गेले, यामागचे गुढ कायमच राहिले आहे.
विषारी द्रव्य प्राशन केल्याचा अंदाज
पोलीस तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी तिघांची उलटी आढळून आली होती. तसेच फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले होते. या तिघांनीही विषारी द्रव्य प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.