ट्रकचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

म्हापसा : करासवाडा म्हापसा जंक्शनवरील उड्डाणपुलाखाली मालवाहू ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्याम बाबाजी मयेकर (५७, रा. करासवाडा) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ट्रक चालक मिंगेल गोम्स (५६, रा. सुर्ला, डिचोली) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला.
अपघात शुक्रवारी सकाळी ११.१५ वा. सुमारास घडला होता. संशयित आरोपी चालक मिंगेल गोम्स हा आपला मालवाहू ट्रक घेऊन धुळेरहून थिवीच्या दिशेने जात होता. करासवाडा उड्डाणपुलाखाली रस्त्यावरून चालत जाणारे श्याम मयेकर यांना या ट्रकने धडक दिली. ट्रकची ठोकर बसल्याने मयेकर रस्त्यावर कोसळले. त्यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेले.
अपघातात मयेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच म्हापसा जिल्हा इस्पितळात रूग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ बांबाेळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
म्हापसा पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी व हवालदार सतीश ठाकूर यांनी पंचनामा केला. निष्काळजीपणे वाहन हाकून निष्पाप पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६ (१) अन्वये पोलिसांनी संशयित ट्रक चालक गोम्स याच्याविरुद् गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.