Home >> ताज्या बातम्या >> गोव्याच्या एससीईआरटीचे ‘जय महाराष्ट्र’

गोव्याच्या एससीईआरटीचे ‘जय महाराष्ट्र’

८० टक्के लेखक बाहेरील : गोमंतकीय साहित्यिकांना डावलले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th June, 10:06 pm
गोव्याच्या एससीईआरटीचे ‘जय महाराष्ट्र’

एका बाजूला मराठी ही गोव्याची भाषा असून तिला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे; तर दुसऱ्या बाजूला गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी तयार केलेल्या नव्या मराठी अभ्यासक्रमात गोमंतकीय साहित्यिकांनाच दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होत आहे. पाचवी ते नववीच्या मराठी पुस्तकांतील सुमारे ८० टक्के लेखक गोव्याबाहेरील असल्याचे समोर आले असून यामुळे साहित्य क्षेत्रात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

गोव्याबाहेरील लेखकांचे वर्चस्व

एससीईआरटीच्या नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या लेखकांच्या यादीत महाराष्ट्रातील आणि अन्य राज्यांतील लेखकांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. ग. दि. माडगुळकर, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, गंगाधर गाडगीळ, मंगेश पाडगावकर, साने गुरुजी, वसंत बापट, निनाद बेडेकर, दिलीप प्रभावळकर, गुरू ठाकूर यांसारख्या लेखकांचा समावेश आहे.

याउलट गोव्यातील साहित्यिकांचे प्रतिनिधित्व मर्यादित राहिल्याचे दिसून येते. बा. भ. बोरकर, विष्णू वाघ, दत्ता नाईक, राधिका नागवेकर, सुदेश लोटलीकर, पौर्णिमा केरकर, नरेंद्र नाईक, कवींद्र फळदेसाई, चंद्रकांत गावस, मीना समुद्र यांच्यासह काही मोजक्याच गोमंतकीय लेखकांना स्थान मिळाले आहे.

अभ्यासक्रमातील असमतोल?पाचवी ते नववीच्या पुस्तकांमधील सुमारे ६५ हून अधिक लेखक गोव्याबाहेरील असून, गोमंतकीय लेखकांचे प्रमाण अंदाजे २० टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा साहित्यिकांकडून करण्यात येत आहे.

साहित्यिकांमध्ये प्रचंड नाराजी

नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अनेक महिने खर्च करण्यात आले. मात्र गोव्यातील लेखकांना अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने साहित्यिकांमध्ये असंतोष आहे. अभ्यासक्रम तयार करताना स्थानिक साहित्य, संस्कृती आणि गोमंतकीय विचारविश्व यांचा अधिक समावेश होणे अपेक्षित होते, असे मत व्यक्त होत आहे.

दूरदृष्टीचा अभाव, स्थानिक साहित्यिकांविषयी अपुरी माहिती किंवा परिचित लेखकांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती यामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता काही ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

६५ हून अधिक बाहेरील लेखक
  • पाचवी ते नववीच्या पुस्तकांमध्ये ६५ पेक्षा अधिक गोव्याबाहेरील लेखकांचा समावेश.
  • बहुसंख्य लेखक महाराष्ट्रातील असल्याचे दिसून येते.
  • संत साहित्य आणि काही दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक वगळले तरी बाहेरील लेखकांचे प्रमाण लक्षणीय.
  • गोमंतकीय लेखकांची संख्या अंदाजे १० ते १५ दरम्यान.
  • स्थानिक लेखकांचे प्रतिनिधित्व केवळ सुमारे २० टक्क्यांपर्यंत मर्यादित.

गोव्यातील लेखक सापडले नाहीत?

ही पुस्तके पाहिल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केली असावीत असा भास होतो, अशी प्रतिक्रिया काही साहित्यिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या पुस्तकांचे संपादकीय मंडळ गोव्यातीलच असतानाही स्थानिक साहित्यिकांना अधिक स्थान का देण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोव्यात मराठी, कोकणी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये लेखन करणारे शेकडो साहित्यिक सक्रिय आहेत. तरीही त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी या अभ्यासक्रमातून मोठ्या प्रमाणावर गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुस्तकनिहाय महाराष्ट्रातील लेखकांचे प्रमाण
  • पाचवी : १४ पैकी १२ पाठ किंवा कविता महाराष्ट्रातील लेखकांच्या.
  • सहावी : १३ पैकी ९ ते १० पाठ किंवा कविता महाराष्ट्रातील लेखकांच्या.
  • सातवी : १२ पैकी ९ पाठ किंवा कविता महाराष्ट्रातील लेखकांच्या.
  • आठवी : २० पैकी १४ पाठ किंवा कविता महाराष्ट्रातील लेखकांच्या.
  • नववी : १२ पैकी ११ पाठ किंवा कविता महाराष्ट्रातील लेखकांच्या.
ठळक गोमंतकीय लेखक

बा. भ. बोरकर, संत सोहिरोबानाथ आंबीये, विष्णू वाघ, दत्ता नाईक, राधिका नागवेकर, सुदेश लोटलीकर, गजानन देसाई, पौर्णिमा केरकर, नरेंद्र नाईक, कवींद्र फळदेसाई, चंद्रकांत गावस, मीना समुद्र, घनश्याम बोरकर, शिवानंद बाक्रे आदी.

स्थानिक साहित्याला न्याय देण्याची मागणी

गोव्याचा इतिहास, संस्कृती, सामाजिक वास्तव आणि भाषिक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक साहित्यिकांना अधिक प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अभ्यासक्रमाचा पुढील फेरआढावा घेताना गोमंतकीय लेखकांना न्याय देण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

हेही वाचा
सर्व पहा