जेईई ॲडव्हान्समध्ये ३५३ वी रँक : आयआयटी गुवाहाटीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला प्रवेश

सावंतवाडी : आर्थिक अडचणी, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक आव्हानांवर मात करत सालईवाडा-सावंतवाडी येथील कुणाल रामचंद्र गाड याने आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली आहे. देशातील अत्यंत स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स (JEE advanced 2026) परीक्षेत त्याने ऑल इंडिया ईडब्ल्यूएस ३५३ वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे त्याला आयआयटी गुवाहाटी (IIT Guwahati) येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश मिळाला असून सावंतवाडीसह संपूर्ण कोकण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कुणालचा हा यशस्वी प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याची आई गृहिणी असून वडील रामचंद्र गाड हे रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. करोनाच्या काळात वडिलांची नोकरी गेल्यानंतर कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र परिस्थितीसमोर न झुकता त्यांनी मेहनतीच्या जोरावर कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि मुलाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला नाही.
लहानपणापासूनच विज्ञान आणि गणित विषयांमध्ये विशेष रुची असलेल्या कुणालने आठवीत असतानाच अभियंता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. नववीपासून त्याने त्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू केली. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये झाले. दहावीच्या परीक्षेत त्याने ९२ टक्के गुण मिळविले. त्यानंतर सांगेली येथील कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा ८२ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. गेल्या दोन वर्षांत त्याने अत्यंत शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला. नियमित सराव परीक्षा, वेळेचे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्याने जेईई परीक्षेची भक्कम तयारी केली. त्याच्या मेहनतीचे फळ सर्वप्रथम जेईई मेन परीक्षेत मिळाले, जिथे त्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर जेईई ॲडव्हान्समध्ये ऑल इंडिया ईडब्ल्यूएस ३५३ वी रँक मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली.