Home >> ताज्या बातम्या >> भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

विधानसभेचा आखाडा : कुठ्ठाळी


28th June, 10:58 pm
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

सुरुवातीपासून युगोडेपा, काँग्रेसचा गड
दोन निवडणुकांत मतदारांची भाजपला साथ
बहुतांश वेळा मतदारसंघात बहुरंगी लढत

गोवन वार्ता प्रतिनिधी
वास्को : कुठ्ठाळी मतदारसंघाचा विचार केला, तर काही अपवाद वगळता या मतदारसंघातील मतदारांनी युगोडेपा व काँग्रस या पक्षांना साथ दिली आहे. गत विधानसभा निवडणुकीत आंतोनियो वाझ यांनी या समीकरणाला छेद देताना अपक्ष म्हणून निवडून आले. वाझ यांच्यासमोर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, आरजीपी, भाजप आदी उमेदवारांचे आव्हान होते. तथापि ते मोडून काढण्यात ते यशस्वी झाले. यंदाही वाझ निवडणूक रिंगणात असतील. ‘लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी धावून जाणारा आमदार’ म्हणून त्यांची ख्याती आहे. एखादी टीका झाली की ते काबरेबावरे होतात, हे मतदारांनी पाहिले आहे. या मतदारसंघात तिकीट वाटपावेळी भाजप काय भूमिका घेणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.


आंतोनियो वाझ

गत निवडणुकीत आंतोनियो वाझ यांच्यासमोर काँग्रेसचे आव्हान होते. येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर कोणत्या पक्षाचे आव्हान असेल, ते अद्याप तरी उघड झालेले नाही. गत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार ओल‌न्सियो सिमोईस यांच्यासह कुठ्ठाळी काँग्रेसचे गटाध्यक्ष पीटर डिसोझा हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. पीटर डिसोझा हे माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी कुठ्ठाळी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठविला आहे. तथापि पीटर डिसोझा, सिमोईस डिसोझा यांचे कार्य मर्यादित क्षेत्रापुरतेच आहे. कासावली, कुठ्ठाळी, वेळसांव येथे आमदार वाझ यांचे वर्चस्व आहे. भाजपचे सांकवाळ, झुआरीनगर, झरी भागात हक्काचे मतदार आहेत. या मतदारसंघातून भाजपचे माथानी साल्ढाणा आणि नंतर एलिना साल्ढाणा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.

तुळशीदास नाईक

या मतदारसंघात भाजपने योग्य व सर्वसंमतीने उमेदवार दिल्यास भाजप बाजी मारू शकतो. भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून सांकवाळचे उपसरपंच तुळशीदास नाईक यांचे नाव आघाडीवर आहे. या नावाच्या यादीमध्ये पुढील काळात भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सिमोईस डिसोझा

इतर पक्षांच्या इच्छुक उमेदवारीबद्दल काहीच हालचाली नाहीत. तथापि निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची नावे वाढण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी ‘आप’तर्फे निवडणूक लढविली होती. येत्या निवडणुकीत त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार आहेत हे उघड झालेले नाही. या मतदारसंघातून विद्यमान मंत्री मॉविन गुदिन्हो चारवेळा, तर माजी मुख्यमंत्री स्व. बार्बोझा हे तीन वेळा विजयी झाले आहेत. मतदारसंघातून निवडून आलेले लुईस बार्बोझा हे मुख्यमंत्री, तर माथानी साल्ढाणा, एलिना साल्ढाणा, माॅविन गुदिन्हो हे मंत्री झाले होते.


पीटर डिसोझा
१९६७ व १९७२ साली झालेल्या निवडणुकीत युगोडेपाचे लुईस बार्बोझा निवडून आले होते. त्यांनी १९६७ मध्ये अपक्ष उमेदवार एल. सी. कार्वालो यांचा ५,३१५ मतांनी, तर १९७२ साली काँग्रेसचे उमेदवार टेलो मास्कारेन्हस यांचा ६,४१३ मतांनी पराभव केला होता. फ्रोइलानो माशादो हे १९७७ मध्ये काँग्रेसतर्फे, तर १९८० साली अर्स काँग्रेसतर्फे निवडून आले होते. त्यांनी मगो पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला होता. १९८४ मध्ये लुईस बार्बोझा काँग्रेसतर्फे निवडून आले होते. १९८९, १९९४, १९९९ अशा सलग तीन निवडणुकीत माॅविन गुदिन्हो काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. १९९४ च्या निवडणुकीत त्यांनी युगोडेपाचे लुईस बार्बोझा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सीपीआयचे ख्रिस्तोफर फॉन्सेका, भाजपचे अँथोनी फर्नांडिस, बीएसपीचे आंतोनियो फर्नांडिस, एसपीचे वासुदेव वेर्णेकर उमेदवार होते. २००२ मध्ये माॅविन गुदिन्हो यांना युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत विद्यमान आंतोनियो वाझ यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविली होती. २००७ मध्ये काँग्रेसचे माॅवीन गुदिन्हो यांनी युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांचा पराभव केला होता.
२०१२ मध्ये दाबोळी मतदारसंघाची निर्मिती झाल्याने माॅविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीऐवजी दाबोळीतून निवडणूक लढविली. माथानी साल्ढाणा यांनी युगोडेपाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्व. माथानी साल्ढाणा यांनी २०१२ च्या निवडणुकीत गोवा विकास पक्षाच्या नेली रॉडिग्ज यांचा पराभव केला. या निवडणुकीत युगोडेपातर्फे सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर, काँग्रेसतर्फे कायताना झेव्हियर, तृणमूल काँग्रेसतर्फे टोलोंतिनो डिसोझा यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेतल्याने सर्वानुमते माथानी साल्ढाणा यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना बिनविरोध निवडून आणले गेले. २०१७ च्या निवडणुकीत भाजपच्या एलिना साल्ढाणा यांनी अपक्ष उमेदवार व आंतोनियो वाझ यांचा अवघ्या ५१८ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसतर्फे गिलबर्ट मारियानो रॉडिग्ज, गोवा विकास पक्षातर्फे नेली रॉड्रिग्ज, ‘आप’तर्फे ओलन्सियो सिमोईस, युगोडेपातर्फे रमाकांत बोरकर, गोवा सुराज पक्षातर्फे शरण मेटी हे निवडणूक रिंगणात होते. २०२२ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ हे निवडून आले. या निवडणुकीत ‘आप’तर्फे निवडणूक लढविणाऱ्या माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांना शेवटच्या क्रमांकाची मते मिळाली होती.
रेल्वेमार्ग दुपदरीकरण, कोळसा वाहतूक मुख्य प्रश्न
या मतदारसंघातील कासावली येथील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, रेल्वेने करण्यात येणारी कोळसा वाहतूक, पर्यावरण इत्यादी प्रश्नांवर आवाज उठविण्यात येत आहे. कासावली येथील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल की भुयारी रस्ता यासंबंधी वाद आहे. या प्रश्नांवरून आमदार वाझ यांना घेरण्यात येत आहे. तथापि हा आवाज एका गावापुरता मर्यादित असल्याने म्हणावा तसा प्रभाव आमदार वाझ यांच्यावर टाकू शकत नाही. आमदार वाझ यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली आहेत. वाझ हे कुठ्ठाळी शेतकरी क्लबचे अध्यक्ष असल्याने शेतकऱ्यांना कृषी सेवा व पेरणी मशिनांची मोफत सेवा पुरविली जाते. पाणीपुरवठा योग्यरीत्या व्हावा यासाठी प्रयत्न केले. काही महत्त्वाच्या झऱ्यांचे, तळ्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले.

२०२२ च्या निवडणुकीत उमेदवारांनी मिळवलेली मते

हेही वाचा
सर्व पहा