Home >> ताज्या बातम्या >> कोर्टात भांडत बसण्यापेक्षा सामोपचाराने आपापसातील तंटे मिटवा!

कोर्टात भांडत बसण्यापेक्षा सामोपचाराने आपापसातील तंटे मिटवा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन : साखळीत जन कल्याण शिबिराचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th June, 09:06 pm
कोर्टात भांडत बसण्यापेक्षा सामोपचाराने आपापसातील तंटे मिटवा!

घरांच्या भिंती, झाडे किंवा अल्प जागेवरील वादांमुळे मामलेदार कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या खटल्यांमुळे नागरिकांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी राज्य सरकार आणि व्ही. एम. साळगावकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘जनसारथी’ उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सामोपचाराने वाद मिटविण्यावर भर

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाशी संलग्न विधी तज्ज्ञ आणि वकील नागरिकांमधील किरकोळ वाद सामोपचाराने सोडविण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ आणि पैसा खर्च होण्याऐवजी स्थानिक पातळीवरच तडजोडीचा मार्ग निघू शकणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये आयोजित जनकल्याण शिबिरांच्या मालिकेअंतर्गत साखळी रवींद्र भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘जनसारथी’ उपक्रमाचा उद्देशमालमत्ता, भिंती, झाडे, सीमारेषा आणि इतर किरकोळ नागरी वाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने मिटवून नागरिकांना जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवून देणे.

प्रलंबित खटले वर्षाअखेरीस निकाली

लोकांच्या घरांचा आणि मालमत्तेच्या हक्कांचा सरकारला पूर्ण आदर असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, घरे पाडण्यासाठी सरकार स्वतःहून कधीही पुढाकार घेत नाही. अनेकदा शेजारी किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून दाखल होणाऱ्या खटल्यांमुळे अशा कारवाया घडतात.

गोव्यातील मामलेदारांकडे प्रलंबित असलेले मुंडकार प्रकरणे, वनहक्क दावे आणि ‘माझे घर’ योजनेशी संबंधित अर्ज येत्या ३१ डिसेंबरपूर्वी निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची घोषणा त्यांनी केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत?
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक अभिनव योजना राबविण्यात आल्या आहेत.
  • गोव्यात पायाभूत सुविधा आणि मानवी विकास या दोन्ही क्षेत्रांत मोठे बदल घडत आहेत.
  • ‘लाडली लक्ष्मी’, ‘गृह आधार’ आणि ‘दयानंद सामाजिक सुरक्षा’ योजनांबरोबर इतर योजनांचीही जनजागृती आवश्यक आहे.
  • ‘किसान क्रेडिट कार्ड’, कमी व्याजदरातील कर्ज, स्वयंरोजगार कर्ज, ‘माझे घर’ आणि आगामी ‘माझा फ्लॅट’ योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

जनकल्याण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी शुभम देसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध क्षेत्रांत राज्यस्तरीय यश मिळविलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शिबिरामध्ये शेतकरी, नवउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची माहिती देणारे काऊंटर उभारण्यात आले होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

ठळक मुद्दे
  • ‘जनसारथी’ उपक्रमातून सामोपचाराने वाद मिटविण्यावर भर.
  • व्ही. एम. साळगावकर महाविद्यालयाच्या सहकार्याने उपक्रमाची अंमलबजावणी.
  • मुंडकार, वनहक्क आणि ‘माझे घर’ अर्ज ३१ डिसेंबरपूर्वी निकाली काढण्याचे लक्ष्य.
  • जनकल्याण शिबिरात विविध सरकारी योजनांची माहिती.
  • ‘माझा फ्लॅट’ योजनेबाबतही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख.
हेही वाचा
सर्व पहा