Home >> ताज्या बातम्या >> इयत्ता चौथीच्या पुस्तकातही ७५ टक्के लेखक गोव्याबाहेरचे

इयत्ता चौथीच्या पुस्तकातही ७५ टक्के लेखक गोव्याबाहेरचे

१३ पैकी केवळ तीन ते चार लेखकच गोमंतकीय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th June, 10:41 pm
इयत्ता चौथीच्या पुस्तकातही ७५ टक्के लेखक गोव्याबाहेरचे

गोवा एससीईआरटीच्या मराठीच्या पुस्तकांत गोव्याबाहेरील जास्त लेखकांचा समावेश करून गोव्यातील लेखकांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे वृत्त ‘गोवन वार्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर अभ्यास मंडळाने थयथयाट सुरू केला. एक व्हिडिओ जारी करून गोव्यातील लेखकांची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षा थोडी कमी असल्याचे म्हटले आहे. हा वाद सुरू असतानाच इयत्ता चौथीच्या पुस्तकात तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लेखक गोव्याबाहेरील घेतल्याचेही उघड झाले आहे.

व्हिडिओनंतरही वाद कायम

गोव्यातील लेखकांनी अभ्यास मंडळाच्या या गोष्टीला हरकत घेतल्यानंतर आपल्या जवळच्या मंडळींना सांगून आपला एक व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला आहे, पण गोव्यातील असंख्य लेखकांनी ‘गोवन वार्ता’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे कौतुक केले आहे. हे सत्य समोर आणल्यामुळे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच ‘गोवन वार्ता’च्या वृत्तामुळे किमान यापुढे गोव्यातील लेखकांना सन्मान मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. त्याविषयी काही प्रतिक्रिया शुक्रवारी ‘गोवन वार्ता’ने छापल्याही आहेत.

चौथीच्या पुस्तकातील आकडेवारी समोर

मूळ बातमीत ‘गोवन वार्ता’ने फक्त गोव्याबाहेरील जास्त लेखक असल्याच्या गोष्टीवर बोट ठेवले होते. त्या बातमीत कुठेच पुस्तकाच्या दर्जाविषयी किंवा साहित्याविषयी भाष्य केले नव्हते. मात्र अभ्यास मंडळाने त्या बातमीचा चुकीचा अर्थ काढून गेले दोन दिवस आदळआपट सुरू केली आहे.

हे सगळे सुरू असताना काही शिक्षकांनी तिसरी आणि चौथीचे पुस्तक ‘गोवन वार्ता’कडे पोहोचवले आहे. त्यात चौथीच्या पुस्तकात तीन ते चार लेखक हे गोव्यातील आहेत. उर्वरित तेरापेक्षा जास्त लेखक हे गोव्याबाहेरील आहेत. त्यात एक धडा अभ्यास मंडळाने लिहिला आहे. या पुस्तकात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लेखक गोव्याबाहेरील आहेत.

इतर वर्गांची स्थिती

इयत्ता तिसरीच्या पुस्तकात सहा लेखक गोव्याबाहेरील आहेत. अन्य सगळे धडे अभ्यास मंडळाने तयार केले आहेत. पहिली आणि दुसरी इयत्तेची पुस्तके अद्याप छापून आलेली नाहीत.

अनिल सामंत यांचा दावापाचवी ते नववीच्या पुस्तकांविषयी अभ्यास मंडळाने एक व्हिडिओ जारी केला, त्यात अभ्यास मंडळावर नियंत्रक म्हणून काम पाहणारे अनिल सामंत यांनी बातमीत तथ्य नाही, असे म्हटले आहे.

गुणवत्तेचा निकष महत्त्वाचा

पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता चांगली हवी, तर त्यासाठी धडा निवडताना त्यातील भावजीवन त्या वयोगटातील लोकांना जुळणारे आहे का? भाषा योग्य आहे का? गोमंतकीय जीवन त्या पाठ्यपुस्तकात दिसते का? त्यात मुलांना नव्या काळाला सामोरे जाण्यासाठी विचार देणारा मजकूर आहे का? हा सगळा विचार करून पाठ्यपुस्तक तयार केले गेले, असे सामंत यांनी म्हटले आहे.

संबंधित छायाचित्रे

ठळक मुद्दे
  • चौथीच्या पुस्तकात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लेखक गोव्याबाहेरील असल्याचा दावा.
  • अभ्यास मंडळाने व्हिडिओ जारी करून आरोप फेटाळले.
  • गोव्यातील लेखकांनी वृत्ताचे स्वागत केले.
  • तिसरीच्या पुस्तकात सहा लेखक गोव्याबाहेरील असल्याची माहिती.
  • पुस्तकांची गुणवत्ता आणि वयोगटानुसार मजकूर निवडल्याचा अनिल सामंत यांचा दावा.
```
हेही वाचा
सर्व पहा