Home >> ताज्या बातम्या >> गोव्यात दरवर्षी होते सरासरी दोनशे पुस्तकांची निर्मिती

गोव्यात दरवर्षी होते सरासरी दोनशे पुस्तकांची निर्मिती

पाठ्यपुस्तकांत स्थान मिळण्याइतके दर्जेदार साहित्य


28th June, 11:38 pm
गोव्यात दरवर्षी होते सरासरी दोनशे पुस्तकांची निर्मिती

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गोव्यात दरवर्षी सुमारे शंभर लेखकांकडून जवळपास २०० पुस्तके प्रकाशित होतात, अशी माहिती लेखक आणि प्रकाशकांकडून मिळाली आहे. मराठीपेक्षा कोकणी भाषेतील लेखक आणि प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या अधिक आहे. कोकणीत दरवर्षी सुमारे १२५ ते १५०, तर मराठीत ५० ते ७५ पुस्तके प्रकाशित होतात. कोकणी आणि मराठी मिळून दरवर्षी सुमारे शंभर लेखकांची २०० पुस्तके प्रकाशित होतात. हा आकडा सध्या हयात असलेल्या लेखकांचा आहे.
दरवर्षी दर्जेदार कादंबऱ्या प्रकाशित होत नसल्या तरी कथासंग्रह, कवितासंग्रह, प्रवासवर्णन, पुस्तक परीक्षणे आणि अन्य साहित्यप्रकारांची पुस्तके मोठ्या प्रमाणात प्रकाशित होतात. या पुस्तकांमधील अनेक कथा, कविता आणि लेख यांचा मराठी किंवा कोकणी पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश होऊ शकतो. धड्याच्या स्वरूपात समाविष्ट करता येईल इतका दर्जा या साहित्याचा निश्चितच आहे, असे मत मराठी लेखक रामदास केळकर यांनी व्यक्त केले. माझी ४१ पुस्तके प्रकाशित झाली असून काही पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मी दरवर्षी सुमारे ५० पुस्तके प्रकाशित करतो. त्यापैकी बहुतेक मराठी पुस्तके असतात, असे सुदेश आर्लेकर यांनी सांगितले. मी दरवर्षी सुमारे २५ पुस्तके प्रकाशित करतो. त्यात बहुसंख्य पुस्तके कोकणी भाषेतील असतात, असे दिनेश मणेरकर यांनी सांगितले.


पाठ्यपुस्तकांमध्ये पुरस्कारप्राप्त लेखकांचेच साहित्य हवे, असे नाही : डॉ. वझरीकर

लेखक आणि प्राध्यापक डॉ. प्रकाश वझरीकर यांनी सांगितले की, गोव्यात दरवर्षी मराठी आणि कोकणी भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती होते. कथा, कविता आणि ललित साहित्याच्या अनेक पुस्तकांचा दर्जा पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्याइतका चांगला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट होणारे साहित्य हे केवळ ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांचेच असावे, असे आवश्यक नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाषांच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न
गोव्यात गोवा मराठी अकादमी, गोवा कोकणी अकादमी, गोमंतक मराठी अकादमी, कोकणी भाषा मंडळ, साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्था मराठी व कोकणी भाषांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात विविध अकादमींसाठी एकूण सुमारे ७ कोटी रुपयांची तरतूद आहे.
कोकणी अकादमीकडून कोकणी पुस्तकांना, तर मराठी अकादमीकडून मराठी पुस्तकांना अनुदान दिले जाते. दरवर्षी १० लाख रुपयांहून अधिक निधी पुस्तक प्रकाशन अनुदानावर खर्च केला जातो.
पुस्तकांसाठी भाषा पुरस्कार योजनाही आहे. यंदा सरकारने मागील वर्षांपासून प्रलंबित सर्व पुरस्कार वितरित केले.
अपेक्षित विषयांवर धडे लिहून घेणेही शक्य
गोव्यात मराठी आणि कोकणी भाषांमध्ये सातत्याने साहित्यनिर्मिती होत असल्याने गरज पडल्यास पाठ्यपुस्तक मंडळे किंवा संपादक मंडळे स्थानिक लेखकांकडून अपेक्षित विषयांवर धडे लिहून घेऊ शकतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये गोमंतकीय लेखकांना संधी देणे किंवा त्यांच्या साहित्याचा समावेश करणे पूर्णपणे शक्य आहे, असे मत साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.      

हेही वाचा
सर्व पहा