Home >> ताज्या बातम्या >> गोमंतकीयांना डावलले; मराठी साहित्यिकांत नाराजी

गोमंतकीयांना डावलले; मराठी साहित्यिकांत नाराजी

; चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल दै. ‘गोवन वार्ता’चे अभिनंदन


26th June, 11:43 pm
गोमंतकीयांना डावलले; मराठी साहित्यिकांत नाराजी


पाठ्यपुस्तकांत दर्जेदार लिखाण हवे; पण स्थानिकांनाही स्थान हवे !
पाठ्यपुस्तक निर्मितीत स्थानिक साहित्यिकांवर अन्याय का ?
इतर राज्यांतील लेखकांना हरकत नाही; मात्र गोमंतकीयांना प्राधान्य हवे !


गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या मराठी पाठ्यपुस्तकांतील बहुतांश धडे महाराष्ट्रातील लेखकांचे आहेत. याविषयीचे वृत्त दै. ‘गोवन वार्ता’ने शुक्रवार, २६ जून रोजी पान १ वर प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील मराठी साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक लेखक, साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. नोकरीसह सर्वच क्षेत्रांमध्ये स्थानिकाना प्राधान्य देण्याचे धोरण असताना पाठ्यपुस्तक निर्मितीत साहित्यिकांवर अन्याय का, असा प्रश्न विचारला जात आहे. पाठ्यपुस्तकांत दर्जेदार धडे, लिखाण असायलाच हवे; पण स्थानिक साहित्यिकांनाही स्थान असायला हवे, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. समाज माध्यमांवरही या विषयाची बरीच चर्चा असून गोमंतकीयांना डावलल्याबद्दल चीड व्यक्त होत आहे. यासंदर्भात एससीईआरटीने कोणताही खुलासा केलेला नाही.


पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेबाबत संशय घेण्यासारखी स्थिती : डॉ. नारायण देसाई
पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी एक पद्धत वा प्रक्रिया असते, ती योग्यपणे झाली आहे का ? कोणाच्या तरी आदेशावरून घाईगडबडीत ही पुस्तके तयार केली असावीत. पाठ्यपुस्तक तयार होण्यास दोन वर्षे तरी लागतात. पाठ्यपुस्तक तयार करताना काही प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नसल्याने हा प्रकार झाला असावा. भाषेच्या पाठ्यपुस्तकात साहित्य, नवे प्रवाह, परंपरा, वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा अंतर्भाव असायला हवा. यासाठी तज्ज्ञांमार्फत पाठ्यपुस्तक तयार होण्याची गरज आहे. काही दर्जेदार धडे इतर राज्यातील लेखकांचे घ्यायला हरकत नाही, मात्र गोमंतकीय लेखकांना प्राधान्य द्यायलाच हवे. स्थानिक दर्जेदार लेखकांचे धडे वा साहित्य हे पाठ्यपुस्तकात असायलाच हवे, असे मत निवृत्त प्राचार्य डॉ. नारायण देसाई यांनी व्यक्त केले.
हा गोमंतकीय साहित्यिकांवर अन्याय : नरेंद्र आजगावकर
पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या मंडळावर तज्ज्ञ मंडळीच असायला हवीत. सरकार आपल्या मर्जीतील लोकांचीच नियुक्ती पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी करते. ही मंडळी आपल्या मर्जीतील लेखक, साहित्यिकांच्या धड्यांचा समावेश करतात. गोमंतकीय साहित्यिकांना स्थान न देणे हे कोकणीवाद्यांचेही कारस्थान असू शकते, असे मत गोमंतक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी व्यक्त केले.


इतिहास, भूगोल समजण्यासाठी स्थानिकांचेच धडे योग्य : पांडुरंग नाडकर्णी
पाठ्यपुस्तक वा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत स्थानिक इतिहास, भूगोल, पर्यावरण यांना प्राधान्य दिले जाते. विद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या राज्याचा भूगोल, इतिहास, पर्यावरण यांची माहिती मिळायला हवी. यासाठी स्थानिक लेखक वा साहित्यिकांच्या धड्यांचा अधिक प्रमाणात समावेश असायला हवा. परीक्षक तसेच संपादक मंडळाने या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक लेखक, साहित्यिकांच्या धड्यांना अधिक प्रमाणात स्थान मिळेल, याकडे एससीईआरटीने लक्ष द्यायला हवे, असे शालान्त मंडळाचे माजी अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी म्हटले आहे.

जाणीवपूर्वक केलेला अन्याय : रमेश वंसकर
गोव्यात मराठीत बरेच दर्जेदार लेखक व कवी आहेत. मराठी पाठ्यपुस्तकांत मात्र त्यांना फारसे स्थान मिळत नाही. पूर्वीपासून हा प्रकार चालत आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला आहे. या प्रकाराविरूद्ध आवाज उठविण्याची गरज आहे, असे गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी म्हटले आहे.

दर्जा सांभाळून स्थानिकांना स्थान मिळावे : गो. रा. ढवळीकर
गोव्यातही मराठीत दर्जेदार लेखक, कवी आहेत. गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश पाठ्यपुस्तकात व्हायला हवा. गोव्यासह महाराष्ट्रातही दर्जेदार लेखक, साहित्यिक आहेत. त्यांना पाठ्यपुस्तकात स्थान द्यायला हरकत नाही. तरीही शक्यतो गोमंतकीय साहित्यिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मराठी चळवळीतील नेते गो. रा. ढवळीकर यांनी म्हटले आहे.
प्रादेशिकतेला महत्त्व द्यावे : अरुण नाईक
एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे. खरे तर साहित्य निवडताना प्रादेशिकतेला महत्त्व द्यायला हवे. आम्ही म्हणतो गोव्यात चांगले मराठी लेखन होते; पण त्यांना संधी दिली जात नाही. गोव्यातील मराठी लेखकांचे खच्चीकरण होत असून याला जबाबदार कोण, हे शोधले पाहिजे. दै. ‘गोवन वार्ता’ने हा विषय निर्भीडपणे मांडल्याबद्दल अभिनंदन. मराठी व कोकणी पाठ्यपुस्तकांचे शैक्षणिकदृष्ट्या अवलोकन झाले पाहिजे. कारण या पाठ्यपुस्तकांतूनच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होत असतात, असे मत मराठी साहित्यिक अरुण नाईक यांनी व्यक्त केले.
मराठीत दर्जेदार लेखक का घडवता आले नाहीत ? : प्रकाश द. नायक
पाठ्यपुस्तकांत स्थानिक मराठी साहित्यिकांना स्थान नसणे, हा अन्यायच आहे. मात्र यावर गोमंतकीय साहित्यिक आवाज का उठवत नाहीत, हा प्रश्न आहे. पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करण्यायोग्य साहित्य गोमंतकीय मराठी साहित्यिकांचे नसेल तर यात दोष कोणाचा ? गोमंतक मराठी अकादमीवर एकच व्यक्ती बारा वर्षे ठाण मांडून आहे. मराठीत दर्जेदार साहित्य निर्माण करण्यासाठी अकादमीच्या अध्यक्षांनी काय केले ? काहीच न करता गुळाला मुंगळा डसल्यासारखे डसून राहणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. हे सर्व सरकारी खर्चाने होत असल्याने जाब विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे मत कोकणी कवी प्रकाश द. नायक यांनी म्हटले आहे.

पाठ्यपुस्तकांबाबत ठोस धोरण हवे : डॉ. मधू घोडकिरेकर
पाठ्यपुस्तक तयार करताना त्याचा दर्जा व स्थानिकांना स्थान याबाबत ठोस धोरण असायला हवे. ठरावीक लेखकांचेच साहित्य पाठ्यपुस्तकात असता कामा नये. स्थानिक लेखकांवर अन्याय होणार नाही, त्यांना योग्य स्थान मिळेल, अशा प्रकारे धोरण आखायला हवे, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी म्हटले आहे.

कृतीचा तीव्र निषेध : युरी आलेमाव
गोमंतकीयांनी महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणून लढा दिला. मात्र आज सरकार महाराष्ट्रातील विचारधारा जबरदस्तीने गोव्यावर थोपवत आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये गोमंतकीय लेखकांना डावलून महाराष्ट्रातील लेखकांच्या साहित्याचा समावेश करण्याच्या कृतीचा तीव्र निषेध करतो. सरकारने ही पुस्तके मागे घ्यावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

एससीईआरटीने स्पष्टीकरण द्यावे : अमित पाटकर
मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये गोव्याबाहेरील लेखकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, अनेक नामवंत गोमंतकीय मराठी साहित्यिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावरून आपल्या शालेय अभ्यासक्रमाची रचना नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. एससीईआरटीने याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. हा मुद्दा कोकणी विरुद्ध मराठी असा नसून, इतर राज्यांतील साहित्यिकांचे योगदान कमी लेखण्याचाही हेतू नाही. गोव्याला कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील समृद्ध साहित्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या दोन्ही भाषांनी आपल्या संस्कृती, इतिहास आणि ओळखीला समृद्ध केले आहे. दोन्ही भाषांना समान आदर मिळालाच पाहिजे. मात्र, गोव्यातील साहित्यिकांना गोव्यात योग्य मान्यता मिळत आहे का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षण केवळ भाषा शिकवण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या भूमीचा इतिहास, संस्कृती आणि साहित्यिक वारसा यांचीही ओळख करून देणारे असावे. गोव्याबाहेरील साहित्यिकांना वगळण्याची कोणीही मागणी करत नाही. आम्ही केवळ एवढीच अपेक्षा व्यक्त करत आहोत की, गोव्याच्या स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गोमंतकीय साहित्यिकांना त्यांचे योग्य स्थान मिळावे. लेखक आणि साहित्यकृतींची निवड करण्यासाठी कोणते निकष वापरण्यात आले? पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या तज्ज्ञ समितीतील सदस्य कोण होते? अनेक नामांकित गोमंतकीय मराठी साहित्यिकांना वगळण्यामागील कारणे काय आहेत? भविष्यातील आवृत्त्यांमध्ये गोमंतकीय साहित्यिकांना न्याय आणि अर्थपूर्ण प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कोणती पावले उचलली जाणार आहेत? या प्रश्नांची उत्तरे एससीईआरटीने देणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा
सर्व पहा